वाशिम, दि. १४ : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी विकास योजना अंतर्गत २०१९-२० अंतर्गत वितरीत करण्यात आलेल्या निधी खर्चाचा आढावा घेण्यासाठी आज, १४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. पुनर्नियोजन प्रस्ताव, सन २०२०-२१ चा प्रारूप आराखडा आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेच्य अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बन्सोड, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे राजेंद्रकुमार हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्राप्त झालेला निधी विहित कालावधीत खर्च होण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी आवश्यक नियोजन करणे अपेक्षित आहे. त्यानुसार निधी मागणीचे प्रस्ताव तातडीने जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत. ज्या विभागांचा निधी शिल्लक राहणार आहे अथवा ज्या विभागांना अधिक निधीची आवश्यकता आहे, त्यांनी त्याबाबतचा पुनर्नियोजन प्रस्ताव तातडीने सादर करावा.
सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा जिल्हा वार्षिक योजना प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून याकरिता ज्या शासकीय यंत्रणांनी अद्याप आपली मागणी नोंदविलेली नाही, अशा यंत्रणांनी त्वरित आपले प्रारूप आराखडे सादर करावेत. सन २०१९-२० मधील निधी विहित कालावधीत खर्च करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.





