33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ सर्व सांभाळत असताना आरोग्याचीही काळजी घ्या- मंगलाताई पटोलेचे महिलांना आवाहन

सर्व सांभाळत असताना आरोग्याचीही काळजी घ्या- मंगलाताई पटोलेचे महिलांना आवाहन

0
40

लाखनी,दि.01ः-महिला ही घरातील सर्वच भूमिका यशस्वीपणे निभावते. आज महिला राजकारणात व समाजकारणासह सर्वच क्षेत्रात आहे. मात्र महिलांची प्रगती अधिकाधिक व्हावी यासाठी समाजातील सर्व महिलांनी विविध माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना व स्वयंरोजगार, गृहउद्योग या क्षेत्रात लक्ष घालावे. तसेच सर्व योजनांचा फायदा घेऊन आपल्या प्रगतीचा मार्ग आत्मसात करावा.घरासाठी आणि समाजासाठी काम करत असताना आपल्या आरोग्याची देखील योग्य काळजी घ्यावी असे प्रतिपादन मंगलाताई पटोले यांनी केले. लाखनी येथे लाखनी तालुका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने आयोजित महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना त्या अध्यक्षस्थानाहुन बोलत होत्या.

यावेळी मंचावर सरीताताई फुंडे, एड. स्मिता मेश्राम,माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री गिल्लूरकर, जया भूरे, माजी जि.प. सदस्या रूपलता जांभुळकर, लाखनी पंचायत समिती उपसभापती मोरेश्वरी पटले, पं.स. सदस्या रजनी आत्राम, मोनाली गाढवे, मुरमाड़ी/ सा. च्या सरपंचा सुनिता भालेराव, सुनंदा धनजोडे, गीता तितीरमारे, सुरेखा निर्वाण, प्रिया खंडारे, गीता मेहर, रजनी मुळे, मंगला निर्वाण आदी उपस्थित होत्या.

यावेळी सरीताताई फुंडे यांनी देखील महिलांशी संवाद साधला. सणासुदीच्या निमित्ताने महिला एकत्र येत असतात. मात्र हा एकोपा महिलांनी व्यवसाय क्षेत्रात देखील आणावा आणि लघुउद्योग असतील किंवा अन्य छोट्या उद्योगांमधून मोठं होण्याचं ध्येय ठेवावे. आपलं घर, आरोग्य हे यशस्वीपणे सांभाळावेच मात्र त्यासोबतच पक्ष संघटनेकडे देखील लक्ष द्यावे आणि आपल्या अधिकारांचा वापर आपण प्रभावीपणे कसा करता येईल याबाबत सदैव जागरूक रहावे. अनादी काळापासून स्त्रीची भूमिका ही समाजात महत्त्वाची राहिली आहे आणि आजही आहे असे प्रतिपादन सरीताताई फुंडे यांनी केले.
एड. स्मिता मेश्राम यांनी महिलांचे अधिकार यावर मार्गदर्शन केले.प्रास्ताविकाच्या माध्यमातून लाखनी तालुका महिला कॉंग्रेसच्या विविध उपक्रमांची माहिती आणि कार्यक्रमाबद्दलची माहिती मीनाक्षी बोपचे यांनी सादर केली.या कार्यक्रमाला तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला भगिनी उपस्थित होत्या. याप्रसंगी सर्व महिलांसाठी हळदीककुंकू व वाणवाटप कार्यक्रम झाला. महिलांनी गीत तसेच उखाने सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष मिनाक्षी बोपचे यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष माया अंबुले यांनी केले.