भंडारा,दि.02ः-पीक विम्याची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात वळती करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी त्यासंबंधीचे कोणतेही लेखी निर्देश बॅंकांना मिळाले नसल्याने बॅंकांनी रिर्जव्ह बॅंकेच्या निर्देशानुसार पीक विम्याची रक्कम थेट शेतकर्यांच्या कर्ज खात्यात वळती केली आहे. लेखी निर्देशाअभावी शेतकरी व बॅंक प्रशासन संभ्रमात असून या योजनेतील घोळ पुन्हा समोर आला आहे.
दुष्काळामुळे शेतपिकांचे नुकसान झाले तर त्याचा फटका शेतकर्यांना बसू नये. तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई काढता यावी म्हणून पिकविमा योजना अंमलात आली. त्यामुळे ज्या शेतकर्यांना पिकविम्याचे संरक्षण होते. त्यांना विम्याची रक्कम देण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांच्या खात्यात रक्कम वळती करण्याविषयीची घोषणा केली. परंतु, त्यासंदर्भात स्पष्ट निर्देश लेखी स्वरूपात अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे विमा कंपनीने विम्याची रक्कम एनईएफटीमार्फत शेतकर्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्याचे सत्र सुरू केले आहे.
कर्जाची रक्कम तशीच ठेवून विम्याची रक्कम शेतकर्यांच्या बचत खात्यात द्यावी, अशी शेतकर्यांची अपेक्षा आहे. परंतु, रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत बॅंका असल्याने त्यांच्या निर्देशाप्रमाणे ज्या शेतकर्यांच्या कर्जाचे पुर्नगठण झाले व त्यांनी नवीन कर्ज उचलले नाही. त्याच कर्जदार शेतकर्यांना बचत खात्यातून रक्कम दिली जाईल. तशी रक्कमही कर्ज न उचलणार्या शेतकर्यांच्या खात्यात जमा सुद्धा करण्यात आली आहे. जर का रक्कम सरसकट दिली तर आरबीआयच्या निर्देशांचा भंग म्हणून बँका दंडास पात्र ठरतील. त्यामुळे या संदर्भात सरकारने रिझर्व्ह बँकेशी चर्चा करून स्पष्ट धोरण ठरविणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींही याकरिता सरकारवर दबाव आणावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे





