गोंदिया,दि. 4.: जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम व राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत स्पर्श कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती अभियान महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2020 पर्यंत कुष्ठरोग व क्षयरोग निवारण पंधरवाडा गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभारेनगर गोंदिया द्वारे मुन्सिपल हायस्कूल शाळेत शालेय विद्यार्थींची प्रश्न मंजुषाचे आयोजन 3 फेब्रुवारी 2020 ला करण्यात आले. यावेळी जिल्हा कुष्ठरोग व क्षयरोग अधिकारी डॉ.राज पराडकर यांनी सदर रोगाबाबत माहिती देवून कुष्ठरोगमुक्त व क्षयरोगमुक्त गाव निर्माण करण्याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. या माध्यमातून पुढील काळात कुष्ठरोग व क्षयरोगाचे प्रमाण शून्यावर आणण्याचे ध्येय निश्चित केले आहे. प्रश्न मंजुषामध्ये विजयी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व रोख बक्षीस देवून गौरव करण्यात आले. कार्यक्रम आयोजनासाठी श्रीमती शेख, श्री कापसे व इतर शिक्षक यांचे विशेष सहकार्य मिळाले. तसेच या कार्यक्रमासाठी श्री पडोळे व जाधव यांनी विशेष प्रयत्न केले. उपस्थितांचे आभार वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा येडे यांनी मानले.





