गडचिरोली,दि.13: जागतिक महिला दिननिमित्त जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे हस्ते महिला सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन प्रशासन व आधार विश्व फौंडेशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, आधार विश्व फौंडेशनच्या अध्यक्षा गीता हिंगे, सचिव सुनिता सालवे व फौंडेशनच्या सदस्या मोठया संख्येने उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला सफाई कामगारांचा सन्मान त्यांच्या योगदानाबद्दल झाडाचे रोप व शाल देवून करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी आधारविश्व फौंडेशनच्या महिलांनी जिल्ह्यात केलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले की संसथेने स्मशानभूमी परिसर स्वच्छता, सेमाना गार्डन स्वच्छता तसेच पूरपरिस्थिती दरम्यान केलेल्या कार्याची दखल प्रशासनासह माध्यमांनी घेतली आहे. समाजातील विविध वर्गातून एकत्रित आलेल्या महिलांनी सामाजिक कार्यातून महिलांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे. महिला सक्षमीकरणाचे विविध सामाजिक उपक्रम यापुढे राबवावेत असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी यांनी महिला सफाई कामगारांच्या योगदानाबाबत माहिती दिली.
यावेळी आधार विश्व फौंडेशनच्या अध्यक्षा गीता हिंगे यांनी संस्थेने केलेल्या कामांबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांना ‘अवयव दान ‘ याबाबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा. विजया मने यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.विना जंबेकर यांनी मानले.
****





