भंडारा,दि. 14 :– आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहे. तसेच आंतराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण महाराष्ट्रात ही आढळून आल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे तसेच सदर संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती जिल्हयात उदभवू नये, यासाठी जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 लागू केला आहे.
पुर्वतयारी व प्रत्यक्ष अंमलबजावणी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते व जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद मोटघरे यांना संनियंत्रक म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक विभागाने आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना आदेशित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. विभागवार सनियंत्रण अधिकारी याप्रमाणे आहेत.
गृह विभाग- जिल्हा पोलीस अधिक्षक व अतिरिक्त पोलीस अधिक्षक, आरोग्य विभाग- जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी, नगर परिषद व नगर पंचायत- नगर प्रशासन अधिकारी, सर्व मुख्याधिकारी व सर्व प्रशासन अधिकारी, जिल्हा परिषद- मुख्य कार्यकारी अधिकारी, महसूल विभाग- सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार, अन्न व प्रशासन विभाग- सहआयुक्त, अन्न व प्रशासन विभाग, शिक्षण विभाग- शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक, रेडक्रॉस , लायन्स रोटरी क्लब, राज्य उत्पादन शुल्क विभाग- अधिक्षक राज्य उत्पादन शुल्य असे आहेत. सर्व विभागांनी जबाबदारीच्या अनुषंगाने वेळोवेळी आवश्यक ती कार्यवाही करावी व दैनंदिन अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षास जिल्हा रुग्णालय येथे सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.




