
गोंदिया दि.03 (जिमाका) दिवसेंदिवस जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी प्रत्येक नागरिकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. शासनाकडून वेळोवेळी काढण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले
2 जुलै रोजा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कोरोनाविषयी मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले,प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भारतभूषण रामटेके व डॉ नितीन कापसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.बलकवडे म्हणाल्या,कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे.परंतु प्रशासनामार्फत नागरिकांना देण्यात आलेल्या सूचनेची नागरिकांकडून काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.जो कोणी नियम मोडेल त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.असे त्या म्हणाल्या.
लॉकडाऊन कालावधीत जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे सांगून डॉ.बलकवडे म्हणाल्या,विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर, मास्क न वापरणाऱ्यांवर तसेच मास्क इकडे तिकडे फेकणाऱ्यांवर, सुरक्षित सामाजिक अंतर (सोशल डिस्टेंसिंग) न ठेवणाऱ्यांवर, गर्दी करणाऱ्यांवर, 5 पेक्षा अधिक नागरिक एकत्र झाल्यावर, स्वच्छता न पाळल्यास आदि बाबी निदर्शनास आल्यावर त्यांच्या विरुध्द विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्या नागरिकांवर तसेच कार्यालय ,आस्थापना, दुकान, संस्था, संघटना या ठिकाणी सार्वजनिक अंतर न ठेवता 5 पेक्षा अधिक नागरिक एकत्र आल्यावर पोलिस व महसुल विभागांच्या भरारी पथकांना गर्दी नियंत्रण करण्यासाठी विशेष मोहिमेंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश डॉ. बलकवडे यांनी दिले.
त्याचप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हयातील सर्व आस्थापना, दुकान, संस्था, संघटना, कार्यालय यांना त्यांच्या आस्थापनात येणाऱ्या सर्व नागरिकांची नोंद नोंदवहीमध्ये करणे आवश्यक आहे, असे न आढळल्यास त्यांच्या विरुध्द कारवाई करण्यात येईल असेही डॉ.बलकवडे यांनी सांगितले.आस्थापना, दुकानदार यांनी शक्यतो कॅश ऐवजी ई-पेमेंट स्वीकारावा असेही आवाहनही जिल्हाधिकारी डॉ बलकवडे यांनी केले आहे.
कोविड-19 मध्ये व्यक्तीला ताप, खोकला, सर्दी तसेच गंध न येणे, तोंडाची चव (स्वाद) जाणे, अतिसार (डायरिया) हे सर्व लक्षणे आहेत. कोणत्याही व्यक्तीला अशाप्रकारची लक्षणे असल्यास त्यांनी तात्काळ आरोग्य यंत्रणेच्या जिल्हास्तरीय कोरोना सल्ला केन्द्रात 8308816666, 8308826666 या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या शंकाचे निराकरण करावे. आपल्या परिसरात आजाराची लक्षणे असलेल्या नागरिकांनी या बाबतची माहिती वरील क्रमांकावर द्यावी असे त्या म्हणाल्या.





