अर्जुनी मोरगावात जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
384

अर्जुनी मोरगाव,दि.04ः अर्जुनी मोरगाव नगरपंचायत क्षेत्रात आज मंगळवार ते गुरुवारपर्यंत हे तीन दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन नगरपंचायततर्फे करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिक, व्यापारी तसेच विविध आस्थापनांनी कर्फ्युच्या पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद देत जनता कर्फ्यु 100% यशस्वी केला.बँका, शासकीय कार्यालये, औषधालये, रुग्णालये आणि डेअरी वगळता सर्वच आस्थापना कडकडीत बंद ठेवण्यात आल्या.सोमवारी नगरपंचायत मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात सभा घेण्यात आली. सभेत स्थानिक व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात व्यापारी आस्थापना विषयी सविस्तर चर्चा करून मंगळवार ते गुरुवार तीन दिवसांच्या जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला.शुक्रवारपासून व्यापारी आस्थापना सकाळी 9 ते 2 यावेळेत पुढील आदेशाप्रमाणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.स्थानिक सिंगलटोली प्रभाग एक मध्ये रविवारी तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी प्रभाग 1 व 2 कोअर झोन आणि 5 व 6 ला बफर झोन म्हणून घोषित केले आहे.