अ‌ॅम्बुलन्समधील ऑक्सिजन संपल्याने महिलेचा मृत्यू

0
849
गोंदिया दि.०४:- वैद्यकीय महाविद्यायातून आज पहाटे दोन महिला रुग्णांना नागपूर हलविताना गोंदियापासून ३० किलोमीटर अंतरावर अ‌ॅम्बुलन्समधील ऑक्सिजन संपल्याने एका महिलेचा रस्त्यातच ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची घटना घडली. तर दुसऱ्या महिलेला परत गोंदियात आणून दुसऱ्या अ‌ॅम्बुलन्सने नागपूरला उपचारासाठी पाठविण्यात आले. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गोंदिया तालुक्यातील काटी या गावातील एक ४० वर्षीय राजवंती जैपाल पाचे या महिलेसह शहराच्या शास्त्री वार्डात राहणाऱ्या एका महिलेला सोमवारी रात्री अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने दोन्ही महिलांना रात्री वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघींची प्रकृती गंभीर असल्याने दोघींनाही एकाच अ‌ॅम्बुलन्सने नागपूरला पाठविण्यात आले.अ‌ॅम्बुलन्समधील स्टाफने दोन्ही गंभीर रुग्णांना अ‌ॅम्बुलन्सद्वारे नागपुरात नेत असताना अ‌ॅम्बुलन्समधील सिलेंडरमध्ये ऑक्सिजनचा किती साठा उपलब्ध आहे, याची खात्री न करताच नागपूरच्या दिशेने जायला सुरवात केली.काही अंतरावर जाताच ऑक्सिजनचा साठा संपल्याने महिलेचा रस्त्यातच मृत्यू झाला. या संदर्भात गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. व्ही.पी. रुखमोडे यांना विचारणा केली असता गंभीर असलेल्या रूग्णांना नागपूर रेफर करण्यासाठी रूग्णवाहिका बोलाविण्यात आली. परंतु तब्बल दोन तास रूग्णवाहिका आलीच नाही असे वैद्यकीय अधिष्ठाता व्ही.पी.रूखमोडे यांनी सांगितले. त्यानंतर आलेल्या रूग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलिंडर संपले होते. त्यामुळे शासकीय वैद्यकीत महाविद्यालयातून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला. मात्र ते सिलिंडर पूर्ण भरले अथवा अर्धे आहे हे तपासण्याची जबाबदारी ही १०८ या रूग्णावाहिकेच्या डॉक्टर व तेथील ब्रदरची होती.
कोविड रूग्णांच्या सुरक्षेसाठी २० लहान व १४७ मोठे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असल्याचे अधिष्ठाता यांनी सांगितले. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असताना ऑक्सिजनअभावी रूग्णांचा मृत्यू होत असेल तर या प्रकाराला हलगर्जीपणाशिवाय दुसरे काहीच म्हणता येणार नाही.
कोरोना संशयित असलेल्या त्या मृताचा स्वॉब आधीच घेण्यात आला. परंतु आतापर्यंत तपासणीचा रिपोर्ट आला नाही. ऑक्सिजन सिलिंडरचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना ऑक्सिजनअभावी रूग्णाचा मृत्यू होणे ही बाब दुर्दैवी आहे.