भंडारा दि. 4- लोक प्रशासनात अनुकरणी य व उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या केंद्र व राज्य शासनातील अधिकाऱ्यांना गौरविण्यासाठी पंतप्रधान पारितोषिक योजना राबविण्यात येते. सर्व राज्यांनी या योजनेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, अशा सूचना केंद्र शासनाद्वारे दिल्या आहेत. या योजनेत जिल्हयातील अधिकाऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले.
पंतप्रधान पारितोषिक योजना-2020 च्या मार्गदर्शक सूचना डीएआरपीजी च्या darpg.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सदर योजनेचा पात्रता कालावधी 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2018 असा आहे. या पारितोषिकाचा वितरण समारंभ राष्ट्रीय एकता दिवस 31 ऑक्टोंबर 2020 रोजी संपन्न होणार आहे.
पारितोषिकाची वर्गवारी जिल्हा कामगिरी निर्देशांक कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि नविण्यता, नाविण्यता सामान्य कामगिरी अशी आहे. या पोर्टलवर सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी डीपीआयजी कार्यक्रमांतर्गत नमुद किमान एका योजनेखाली व नाविण्यता कार्यक्रमासाठी जिल्हयासह राज्यस्तरावरील कार्यालय प्रमुखांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेचे अर्ज 15 ऑगस्ट 2020 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात केंद्र शासनामार्फत स्विकारण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट असून ती कोणत्याही परिस्थितीत वाढविली जाणार नाही.
सर्व कार्यालय प्रमुखांनी विहीत कालावधीत नोंदणी करुन त्यांचे अर्ज परस्पर केंद्र शासनाच्या नमुद पोर्टलवर विहीत नमुन्यात अपलोड करावेत जेणेकरुन पंतप्रधान पारितोषिक योजना-2020 मध्ये आपल्या जिल्हयाचा जास्तीत जास्त सहभाग राहील, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.