
भडारा दि.08 : कोरोनाचा संसर्ग वाढत असून जिल्हा टास्क फोर्सने अधिक सतर्क व सज्ज राहण्याची आवश्यकता आहे. वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी आप आपसात समन्वय ठेवून सकारात्मक वृत्तीने हा लढा लढण्याची वेळ आहे. या लढयात डॉक्टर्स, पालीस, प्रशासनातील अधिकारी कर्मचारी व पालीका प्रशासन या फ्रंटलाईन वर्करची भुमिका अतिशय महत्वाची असून कोरोना विरूध्दच्या लढयात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.
भंडारा जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधूरी माथूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल डोकीरमारे, डॉ. प्रशांत उईके व आयएमए भंडारा शाखेच अध्यक्ष डॉ. नितीन तुरसकर यावेळी उपस्थित होते.
भंडारा जिल्हयात 7 कोविड केअर सेंटर असून भंडारासाठी राजे दहेगाव येथे सेंटर आहे तर प्रत्येक तालुक्याला 1 कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. सामान्य रूग्णालय येथे 4 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आहेत तर 1 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहे. या सर्व ठिकाणी 1200 बेडची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. रूग्ण संख्या वाढल्यास पर्यायी हॉस्पिटलसह बेडचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
पुरामुळे तात्पूरत्या शिबीरात व्यवस्था करण्यात आलेल्या नागरिकांची अँटिजेन चाचणी करण्यात यावी असे ते म्हणाले. जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर देण्यात यावा. खाजगी रूग्णालयाला कोविड रूग्णालय करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे सामान्य रूग्णालयात अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले. रूग्णालयासाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ तात्पुरत्या स्वरूपात घेण्याबाबत व सामान्य रूग्णालयाला लागणाऱ्या ऑक्सीजन जंबो सिलेंडरचा कोटा 400 करण्यावर बैठकीत सहमती झाली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी फ्रंटलाईन वर्कर म्हणून कार्य करणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलीस, पालिका कर्मचारी व प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी सांगितले. हायरिस्क रूग्णाला लागणाऱ्या रक्त पेशिचा साठा भंडारा येथे उपलब्ध असावा, अशी सुचना त्यांनी केली. फ्रंटलाईन वर्कर यांच्याशी अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना या संसर्ग आजाराशी लढण्यासाठी समाजातील सेवाभावी व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्हातील स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधून या बाबत त्यांची सहमती घ्यावी. कोविड केअर सेंटर मधील जेवणाचा दर्जा उत्तम ठेवण्यावर भर दयावा. रूग्णांना भोजन देण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांनी रूग्णास भेटण्याचा आग्रह करू नये. भेटीच्या आग्रहमुळे संसर्गाचा धोका संभवतो. मृत देह व्यवस्थापना बाबत मुख्याधिकाऱ्यांनी काही सुचना केल्या त्यावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या बैठकीत कोरोनासह सोयी सुविधा यावर चर्चा करण्यात आली.