35.5 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ पदवीधर निवडणुकीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण द्यावे – विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार

पदवीधर निवडणुकीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण द्यावे – विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार

0
107

नागपूर, दि. 6 : पदवीधर निवडणूक बॅलेट पेपरवर होत असत आता या निवडणुकीत उमेदवाराला पसंतीक्रम द्यावा लागतो यासह अनेक सूक्ष्म बाबी असतात. यानुषंगाने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येण्याच्या दृष्टीने या निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिले.

आयुक्त कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे त्यांनी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून निवडणुकीच्या कामाचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपायुक्त मिलींद साळवे, आशा पठाण, रमेश आडे, अपर जिल्हाधिकारी निशीकांत सुके, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाने नुकताच महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यासाठी प्रशिक्षणात अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रीयेतील प्रत्येक बाबीचे प्रशिक्षण द्यावे. त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात यावे. वाहनासाठी परवानगी ही जिल्हापातळीवर जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल. माध्यम संनियत्रण समिती देखील जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली राहील. तसेच निवडणूक प्रक्रियेतील अहवाल हे वेळेवर विभागीय आयुक्त कार्यालयात पाठविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

प्रचार रॅलीबाबत आयोगाकडून मार्गदर्शन घेण्यात येत असून मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंन्सिग या कोविड त्रिसूत्रीचा अवलंब करून निवडणूक घेण्यात येत असल्याने मतदान केंद्रावर या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.