
५१ जणांचे रक्तदान, २८ नागरिकांनी केले अवयवदानासाठी नोंदणी
गोंदिया, १४ जून-विश्व रक्तदाता दिनानिमित्त श्री नवज्योत फाऊंडेशन, गोंदिया यांच्या वतीने शहरातील हॉटेल पॅसिफिक येथे आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात ५१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवसेवेचा आदर्श घालून दिला, तर २८ नागरिकांनी अवयवदानासाठी नोंदणी करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.शिबिराचे उद्घाटन नगरसेवक बंटी पंचबुद्धे, एसआयपी अबॅकसचे संचालक मयूर त्रिवेदी, डॉ. अमित साबू, श्री नवज्योत फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी जीवन ज्योती ब्लड बँकेचे विशेष सहकार्य लाभले.
शिबिरात महिला रक्तदात्यांचाही उल्लेखनीय सहभाग दिसून आला. वाढत्या सामाजिक जागरूकतेचे हे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी रक्तदान आणि अवयवदानाचे महत्त्व विशद करत अधिकाधिक नागरिकांनी या जीवनदायी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. “रक्तदान हे महादान असून एका युनिट रक्तामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन मिळू शकते,” असा संदेशही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे सर्व मान्यवर, रक्तदाते, अवयवदान नोंदणी करणारे नागरिक, जीवन ज्योती ब्लड बँक आणि उपस्थित नागरिकांचे श्री नवज्योत फाऊंडेशनतर्फे आभार मानण्यात आले.विश्व रक्तदाता दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून रक्तदान व अवयवदानाबाबत समाजात जनजागृती होण्यास मोठी चालना मिळाली असून मानवसेवेच्या कार्यात नागरिकांचा वाढता सहभाग प्रेरणादायी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.




