35.5 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर परिसरात जखमी नर अस्वलाचा मृत्यू

कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर परिसरात जखमी नर अस्वलाचा मृत्यू

0
7

blank

भंडारा : नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र (नागझिरा खंड) अंतर्गत येणाऱ्या कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर परिसरात एका जखमी नर अस्वलाचा मृत्यू झाला. वन्य प्राण्यासोबत झालेल्या झुंजीमध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा वनविभागाचा अंदाज आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडणगाव वनरक्षक ए. सी. हटकर आणि संरक्षण मजूर सकाळी नियमित गस्तीवर असताना वन्यप्राण्यांचे जोरजोरात ओरडण्याचे आवाज ऐकले. आवाजाच्या दिशेने जाऊन त्यांनी पहाणी केली असता, रोपवनाच्या टीसीएम नाल्याजवळील गट क्र. २०६ च्या नाल्यात एक अस्वल हातपाय हलवत विव्हळत असलेले दिसले. काही क्षणातच त्याची हालचाल बंद झाली. जवळ जाऊन पाहिले असता त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्याचे वय सुमारे ५ वर्षे असल्याचे निदर्शनास आले.
या अस्वलाचा झुंजीत मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. एनटीसीएच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार दुसऱ्या प्राण्याचा शोध घेतला जात आहे. अस्वलाचे शवविच्छेदन करण्यासाठी सहायक वनसंरक्षक सुहास कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी सूरजकुमार गोखले, एनटीसीएचे प्रतिनिधी नदीम खान व शैलेश राजपूत आणि मुख्य वन्यजीव रक्षक यांचे प्रतिनिधी पंकज देशमुख तसेच स्थानिक डॉ. शुभम गुरवे, पशुवैद्यकीय अधिकारी, मेघरान तुलावी व्याघ्र प्रकल्पाचे कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी आदी हजर होते.

गुप्तांगावर होती जखम
क्षेत्र संचालक पीयूषा जगताप, उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक सुहास कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी सूरजकुमार गोखले यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपास केला असता अस्वलाच्या गुप्तांगावर जखम आढळली. आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता जवळच पायवाटेवर गुप्तांग पडलेले व रक्त सांडून असलेले दिसले. त्या ठिकाणी झुंज झाल्याचे निशाणही आढळले. समोरील पळसाच्या झुडपात पानांवर, बुंध्याशी रक्ताचे डाग आणि झुंजीचे निशाण दिसले