देवरी,दि.07ः आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र दुर्गम, जंगलव्याप्त, आदिवासी, नक्षलप्रभावीत क्षेत्र आहे. आजही या क्षेत्रात अपेक्षीत विकास झालेला नाही. करीता येथील विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, या आशयाचे निवेदन स्थानिक आमदार सहेषराम कोरोटे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची मुंबई येथे ४ नोव्हेंबर रोजी भेट घेऊन दिले.
देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यातील नवीन रस्त्यांचे बांधकाम, रास्ते खडीकरण, दुरुस्ती, पुल बांधकाम व दुरूस्ती, रस्त्यांचे डांबरीकरण, गावातील सिमेंट काँक्रीट रस्ते, नाली बांधकामाच्या प्रास्तावित कामांची यादी संबंधित विभागाकडे सादर करण्यात आली आहे. वरील बांधकामांसाठी लागणारा निधि उपलब्ध नसल्याने सदर विकास कामात अडथडे येत आहेत. हे अडथडे दूर सारून विकास कामासांठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून स्थानिक आमदार सहेषराम कोरोटे यांनी मुंबई येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेवून क्षेत्रातील विकास कामाबाबद चर्चा करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मागणी केली. प्रसंगी चव्हाण यांनी लवकरच निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही कोरोटे यांना दिली.