
वाशिम, दि. ११: जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधरण) २०२०-२१ मधील निधी खर्च नियोजनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली १० डिसेंबर रोजी नियोजन भवन येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य शासनाने ८ डिसेंबर २०२० रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी प्रशासकीय मान्यता आणि निधी मागणीसाठी परिपूर्ण प्रस्ताव १५ डिसेंबर २०२० पर्यंत जिल्हा नियोजन कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, उप वनसंरक्षक सुमंत सोळंके, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांच्यासह विविध अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, नियोजन विभागाच्या ८ डिसेंबर रोजीच्या निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून करावयाच्या निधी वितरणावरील बंधने शिथिल करण्यात आली आहेत. त्यानुसार सर्व प्रशासकीय यंत्रणांनी त्यांना जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर असलेल्या विहित नियतव्ययानुसार प्रस्तावित कामांसाठी प्रशासकीय मान्यता व निधी वितरणासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. सदर निधी ३१ मार्च २०२१ पूर्वी खर्च होणे आवश्यक असल्याने त्यादृष्टीने सूक्ष्म नियोजन करून निधी मागणी करावी. ऐनवेळी निधी परत करण्याची वेळ येणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच सर्व यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०२१-२२ च्या प्रारूप आराखड्यासाठी प्रस्तावही १५ डिसेंबर पर्यंत सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.




