
वाशिम, दि. १3 : गावाचा विकास साधायचा असेल तर गावकरी व प्रशासन यांनी एकत्रित येवून प्रयत्न करणे आवश्यक असते. त्यामुळे आपल्या गावाच्या समृद्धीसाठी कोण-कोणत्या बाबी करणे आवश्यक आहे, याचे काळजीपूर्वक नियोजन करून सदर कामे पूर्ण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले. सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या अनुषंगाने मंगरूळपीर तालुक्यातील बोरव्हा बु. गावामध्ये ११ डिसेंबर रोजी आयोजित विविध यंत्रणांच्या जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या सभेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, पानी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेकडे फक्त स्पर्धा म्हणून न पाहता, गावाच्या विकासासाठी काम करण्याची एक संधी म्हणून पाहावे. या स्पर्धेत किती क्रमांकाचे बक्षीस मिळते, यापेक्षा आपले गाव आणि गावातील नागरिकांचा विकास कसा करता येईल, हे ध्येय समोर ठेवून प्रामाणिक प्रयत्न करा. ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून गावामध्ये नक्कीच समृद्धी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच स्पर्धेच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय यंत्रणांनी गावनिहाय नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोहिते म्हणाले, आतापर्यंत आपण मृद आणि जलसंधारणाच्या कामांमधून पाणी साठविण्यासाठी अनेक कामे केली आहेत. पण आता या पाण्याचा योग्य वापर करून आपले उत्पन्न अशाप्रकारे वाढेल, याचे नियोजन प्रत्येकाने करावे. तसेच रोप लागवड, पूरक व्यवसाय उभारणीसाठी सुद्धा प्रयत्न करावेत.
श्री. हिंगे म्हणाले, समृद्ध गाव स्पर्धेत रोजगार हमी योजनेतून करावयाची अभिसरणाच्या कामांचे नियोजन संबंधित यंत्रणांनी करावे. त्याबाबतचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत.
श्री. तोटावार म्हणाले, आपल्या गावात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या वापराचा सूक्ष्म आराखडा तयार करावा. त्यानुसार गावामध्ये किती क्षेत्रावर कोण-कोणती पिके लावावीत, हे ठरवावे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतीतील पिकावर होणारा खर्च व मिळणारा निव्वळ नफा याचा हिशोब ठेवावा. शेतीतील उत्पन्न वाढीसाठी कोणते पिक, शेतीपूरक व्यवसाय करता येणे शक्य आहे, याचे नियोजन करून प्रत्येक शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये होण्यासाठी प्रयत्न करावेत.
डॉ. पोळ म्हणाले, प्रत्येक गावकरी हा एखाद्या कामाशी भावनिकदृष्ट्या जोडला जात नाही, तोपर्यंत ते काम शाश्वत स्वरूपाचे होत नाही. त्यामुळे गावामध्ये होणाऱ्या विकास कामांमध्ये सर्वांचे योगदान असणे आवश्यक आहे. आपल्या गावाला समृद्ध बनविण्याची जबाबदरी माझी आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
पानी फाउंडेशनचे सुभाष नानवटे यांनी सत्यमेव जयते समृद्ध गाव योजनेचे स्वरूप, गुणांकनाची पद्धत याविषयी माहिती दिली. कारंजाचे तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर आभार पारवा गट ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाळ लुंगे यांनी मानले.
शिवार फेरीतून जलसंधारणाच्या कामांची पाहणी
बोरव्हा बु. गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ मध्ये राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकाविला होता. या स्पर्धेच्या निमित्ताने गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामांची जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांच्यासह विविध जिल्हास्तरीय शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच या कामांमुळे गावामध्ये निर्माण झालेल्या जलसाठ्याची माहिती जाणून घेतली.




