43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ ‘मानस ॲग्रो’ने ५ महिने उलटूनही ऊस उत्पादकांचे पैसे थकवले

‘मानस ॲग्रो’ने ५ महिने उलटूनही ऊस उत्पादकांचे पैसे थकवले

0
6

blank

प्रादेशिक सहसंचालकांचे कारखान्याला ३ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

स्वराज्य फाउंडेशनच्या तक्रारीची दखल; शेतकऱ्यांना व्याजासह पैसे देण्याची मागणी

तुमसर (प्रतिनिधी) : भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ‘मानस ॲग्रो अँड इन्फ्रा लि. (युनिट-४, देव्हाडा)’ या कारखान्याला गाळपासाठी दिलेल्या उसाचे पैसे ५ महिने उलटूनही मिळाले नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी शासनाकडे केलेल्या आक्रमक पाठपुराव्याची दखल घेत, नागपूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी मानस ॲग्रो कारखान्याला ३ दिवसांच्या आत स्पष्टीकरण आणि कारवाईचा अहवाल सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत.

तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जानेवारी २०२६ च्या हंगामात आपला ऊस देव्हाडा येथील मानस ॲग्रो कारखान्याला गाळपासाठी पुरवला होता. नियमानुसार उसाची डिलिव्हरी झाल्यानंतर ठराविक दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणे बंधनकारक असते. मात्र, तब्बल ५ महिने उलटून गेले तरीही कारखान्याने शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे थकवून ठेवले आहेत. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

स्वराज्य फाउंडेशनकडून थेट शासनाकडे तक्रार…
शेतकऱ्यांवर होत असलेल्या या अन्यायाविरोधात स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी ३१ मे २०२६ रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक सहसंचालकांकडे (साखर) लेखी तक्रार दाखल केली होती. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत पैसे केवळ त्वरित न मिळता, ते कायदेशीर व्याजासह तात्काळ मिळवून देण्यात यावेत, अशी आग्रही मागणी मेश्राम यांनी आपल्या पत्रात केली होती.

शासकीय यंत्रणा कडक; ३ दिवसांत मागवला अहवाल…
अमित मेश्राम यांच्या तक्रार पत्राची गांभीर्याने दखल घेत प्रादेशिक सहसंचालक (साखर), नागपूर विभाग, नागपूर यांच्या कार्यालयाने २ जून २०२६ रोजी मानस ॲग्रोच्या जनरल मॅनेजरना थेट पत्र जारी केले आहे. “सदरहू पत्राचे गांभीर्य लक्षात घेवून, पत्राच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी आणि यासंबंधीचा सविस्तर अहवाल ३ दिवसांच्या आत या कार्यालयास सादर करावा,” असे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी कारखान्याला दिले आहेत. या पत्राची प्रत माहितीसाठी तक्रारकर्ते अमित मेश्राम यांनाही पाठवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण, कारखान्याच्या भूमिकेकडे लक्ष
सामाजिक कार्यकर्ते अमित मेश्राम आणि स्वराज्य युवा एकता फाउंडेशनने प्रशासकीय पातळीवर लावलेल्या या तगाद्यामुळे हवालदील झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता प्रादेशिक सहसंचालकांच्या या कडक आदेशानंतर मानस ॲग्रो कारखाना प्रशासनाला ३ दिवसांत उत्तर द्यावे लागणार असून, कारखाना शेतकऱ्यांचे थकीत पैसे व्याजासह कधी जमा करतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

blank