
भंडारा दि. 8:- कोरोना लसिकरणाचा ड्रायरन आज तीन केंद्रावर घेण्यात आला. ही रंगीत तालीम यशस्वीरित्या पार पाडली असून जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी लसीकरण केंद्राला भेट देऊन ड्रायरन मोहिमेला आढावा घेतला व मोहिम यशस्वी केल्याबद्दल आरोग्य विभागाचे अभिनंदन केले.
8 जानेवारी 2021 ला कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी जिल्हा रुग्णालय भंडारा, उपजिल्हा रुग्णालय तुमसर व प्राथमिक आरोग्य केंद्र धारगांव येथे कोवीड 19 लसीकरणासाठी ” ड्रायरन ” म्हणजे लसीकरणासाठी रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये तीन रुममध्ये लसीकरणासाठी व्यवस्था करण्यात आली होती, पहिल्या रूम मध्ये नोंदणी, दुसऱ्या रुममध्ये लसीकरण व तिसऱ्या रुममध्ये लसीकरणानंतर 30 मिनेटे बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याकरीता एकुण 04 लसीकरण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. लसीकरण अधिकारी -1 हे लाभार्थ्यांला आलेले एस.एम.एस. पाहणे, ओळखपत्र पडताळणी करणे, लाभार्थ्यांचे पल्स ऑक्सीमीटरनी तपासणी करणे व थर्मल स्कॅनरने तपासणी केली, लसीकरण अधिकारी -2 यांनी को-वीन अॅपमध्ये नोंदणी करुन लाभार्थ्यांचे लसीकरण करत होते, लसीकरण अधिकारी -2 हे लाभार्थ्यांचे लसीकरण केल्यानंतर 30 मिनीट बसवून त्यांच्यावर निगरानी करीत होते व लसीकरण अधिकारी -4 हे लाभार्थ्यांचे लसीकरण, नोंदणी, प्रतिक्षाकक्ष तसेच सर्व व्यवस्थापन पाहत होते.
कोवीड 19 च्या लसीकरणासाठी सर्व लाभार्थी यांना एक दिवसाअगोदर को-वीन अॅपद्वारे सिस्टम जनरेटेड एस.एम.एस. आलेला होता. लसीकरण अधिकारी -1 लाभार्थ्यांना आलेला एस.एम.एस. पडताळणी करुन लाभार्थ्यांचे फोटो आयडी कागदपत्र तपासून त्यांना प्रतिक्षाकक्ष येथे थांबवित होते. त्यानंतर प्रतिक्षाकक्ष मध्ये लसीकरण अधिकारी -2 को-वीन अॅप मध्ये नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांला सर्च करुन त्याची माहिती को-वीन अॅपमध्ये भरत होते, लाभार्थ्यांचे नाव सर्च केल्यानंतर तीन प्रकारे लाभार्थ्यांचे व्हिरीफिकेशन करण्याचे सोय को-विन अॅप मध्ये उपलब्ध आहे. बायोमेट्रीक मशीन द्वारे लाभार्थी सर्च, लाभार्थ्यांची संपुर्ण माहिती भरुन व आधारबेस्ड ओटीपीद्वारे लाभार्थ्यांचे व्हिरीफिकेशन केल्या जात होते, आलेल्या लाभार्थ्यांचे आधारबेस्ड ओटीपीद्वारे व्हिरीफिकेशन करुन लसीकरणाकरीता लसीकरण अधिकारी-3 यांचे कडे लसीकरण विभाग येथे पाठविण्यात येत होते. लसीकरण अधिकारी-3 हे लसीकरण करुन कोरोना लसीकरणाचे चार महत्वपुर्ण संदेश देत होते.
- आज आपणास कोरोनाची लस देण्यात आली आहे व ही लस आपले कोरोना आजारापासून संरक्षण करेल असे सांगितले. • लस घेतल्यानंतर कोरोना आजारापासून सुरक्षित राहण्याच्या पध्दती जसे की मास्क लावणे, वारंवार हाथ धुणे आणि सहा फुटांचे शारीरीक अंतर ठेवणे बंधनकारक असेल असे सांगितले. • लसीकरणानंतर आपणास काही त्रास जाणवल्यास आपण आपल्या ए.एन.एम./ आशा कार्यकर्ती, जवळच्या आरोग्य केंद्र किंवा कोरोना कंट्रोल रुमशी संपर्क साधावा असे सांगत होते. त्यासाठी त्यांना मोबाईल नंबर उपलब्ध करुन देण्यात आले. • पुढील डोसची तारीख, वेळ व ठिकाण आपणास आपल्या मोबाईल एस.एम.एस. द्वारे कळविण्यात येईल असे सांगण्यात आले.
लसीकरण झाल्यानंतर लसीकरण अधिकारी -4 हे निरीक्षण कक्षात लाभार्थ्यांला 30 मिनीटे बसवून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होतो का हे निरीक्षण करीत होते. लसीकरण विभागात कोवीड -19 संबंधित सर्व माहिती फलक तसेच कोवीड 19 लसीकरणाचे माहिती बॅनर, पोस्टर इतर आयईसी मटेरीयलद्वारे प्रसिध्दी करण्यात आली होती. अशाप्रकारे लस न देता लसीकरणासाठी संपुर्ण प्रक्रिया यशस्वीपणे राबविली गेली.
कोवीड 19 चे लसिकरणासाठी ड्राय रन या रंगीत तालीमसाठी जिल्हाधिकारी संदीप कदम, जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी व्यक्तीश: भेट देऊन सदर ड्राय रनची पाहणी केली व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना सुचना दिल्या. ड्राय रन मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, डॉ. माधूरी माथूरकर, डॉ. चव्हान व आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. अशा प्रकारे भंडारा जिल्हा कोविड 19 लसिकरणासाठी सज्ज झाले आहे, प्रतिक्षा आहे फक्त कोविड 19 व्हक्शीनची.



