
कुरखेडा,दि.१८ः-आदिवासी विकास महामंडळचे संचालक भरत दुधनाग यांची कुरखेडा तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था चे पदाधिकारी आणि व्यवस्थापक यांनी १६ जानेवारी रोजी देवरी येथे भेट घेवुन संस्थेच्या अडचणी बाबत निवेदन देवुन चर्चा करण्यात आली. यावेळी संचालक दुधनाग यांनी आविकाच्या समस्याबाबत नाशिक मध्ये होणार्या बोर्डाच्या बैठकमध्ये सोडविण्याचा प्रयत्न करणार, असे आश्वासन पदाधिकार्यांना दिले.
भेटीदरम्यान आविका संस्थेचे उपाध्यक्ष चांगदेव फाये ,आंधळी आविका उपाध्यक्ष विनोद खुणे, मार्गदर्शक माधव तलमले, हेमंत सेंदरे, महेद्र मेर्शाम, नरेद्र पटणे, लिलाधर घोसेकर, रूपेश मठ्ठे, वंसतराव हटवार उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सन २0१५-१६ ते २0१९-२0 या कालावधी मधील महामंडळाकडे राखून ठेवलेले मंडी चार्जैस व कमिशन त्वरीत देण्यात यावे. सन २0२0-२१ मधील मंडी चार्जैस व कमिशन दरमहा देण्यात यावे. चालु खरेदी मध्ये १ लाख अग्रीम रक्कम घ्यावी, मागील हंगाम मधील शेतकर्यांचे बारदाना रक्कम घ्यावी व चालु हंगामात आवश्यक बारदाना त्वरीत देण्यात यावी. वनपट्टे धारक शेतकरी यांचे धान खरेदी करण्याची अडचणी त्वरीत दुर करावी. शासकीय निर्णय नुसार धान्याची वेळेत उचल होत नसल्याने १ टक्के घट-तुट अट रद्द करावी. चालु हंगामातील धान त्वरीत उचल करावी. आविका संस्थेच्या कर्मचारी यांचा महामंडळ मध्ये समावेश करावा. कुरखेडा तालुक्यातील आविकाचा कोरची तालुक्यात समावेश असल्यामुळे विविध अडचणी निर्माण होत असल्यामुळे कुरखेडा तालुक्यात समावेश करावा. या प्रमुख मागणी सह विविध मागणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आले.
यावेळी संचालक भरतलाल दुधनाग यांनी नाशिक येथे आदिवासी विकास महामंडळच्या बोर्ड बैठकीत सदर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आविका पदाधिकार्यांना दिले.




