40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गृहमंत्र्यांकडून अनादर !जिल्हाधिकार्‍यांचा निषेध

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गृहमंत्र्यांकडून अनादर !जिल्हाधिकार्‍यांचा निषेध

0
261

blank

-पालकमंत्र्यांच्या पत्र परिषदेवर पत्रकारांचा बहिष्कार
– राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जिल्हाधिकार्‍यांची निष्क्रिय भूमीका
गोंदिया,दि.27ः ः जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर पत्रकारांना पत्र परिषदेसाठी बुधवारी 27 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रीत करण्यात आले होते. परंतू कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशावर पोलीसांनी अडविले. आमंत्रीत केल्यावरही झालेली अडवणूक म्हणजे पत्रकारांचा अपमान असल्याची भावना सर्व पत्रकारांनी व्यक्त करत पत्र परिषदेवर बहिष्कार टाकला. यात जिल्हाधिकार्‍यांची माध्यम प्रतिनिधींना आवर्जून दिलेली अपमानजनक वागणूक व निष्क्रिय भूमीका दिसून आली. याची साधी दखल घेत पत्रकारांना भेटण्याचे सौजन्य जिल्ह्याचे पालक असलेले गृह मंत्री महोदयांनी दाखविले नाही. त्यामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा राज्याचे गृहमंत्र्यांकडूनच चक्क अनादर झाल्याची बाब आजच्या घटनेवरून पुढे आली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर जिल्ह्याच्या विविध विकासासंदर्भात माहिती देण्यासाठी पालकमंत्र्यांची पत्र परिषद घेण्याची परंपरा आहे. त्यानुसार जिल्हा माहिती अधिकार्‍यांनी आज, दुपारी 1ः30 वाजता पत्रकरांना आमंत्रीत केले होते. तेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेशा संदर्भातत कुठलीही सुचना नसल्याचे कारण पूढे करत पोलीसांनी सर्वांना मुख्य प्रवेश द्वारावरच रोखले.विशेष म्हणजे यापुर्वी कोव्हीडचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यासह गृहमंत्री जिल्ह्यात आले असता त्यावेळीही जिल्हाधिकारी मीणा यांनी पोलीस अधिकारी श्रीमती पाटील यांच्यामार्फेत पत्रकारांना गेटवरच अडवणूक केली होती.त्याच श्रीमती पाटील मॅडम यांना आज सुध्दा पत्रकारांना रोखण्यासाठी निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा विकासासाठी आणलेल्या जिल्हाधिकारी यांनी दिल्याचे घटनाक्रमावरुन समोर आले होते.

वास्तविक जिल्हा नियोजन समितीचे सचिव हे जिल्हाधिकारी असतात, त्यांच्या निर्देशानुसारच जिल्हा माहिती अधिकारी सभेतील विकासासंदर्भातील माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी पत्र परिषदेचे आयोजन करण्यात येते. हि बाब सर्वश्रृत असताना पोलीसांना याविषयीची महिती न देणे हा संशोधनाचा विषय ठरत आहे. तर पाोलीसांचेही हे कृत्य तेथे उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी अपमानजनक असेच होते. त्यामुळे पत्रकरांनी पालकमंत्र्यांच्या पत्र परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तसेच प्रशासनातील असमन्वयाची बाब पालकमंत्र्यांना कळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाारावर सर्व माध्यमांचे प्रतिनिधी उभे होते. बैठक संपल्यानंतर पालकमंत्री आपल्या ताफ्यातील वाहनातून निघाले. यावेळी त्यांच्यासोबत खा. प्रफूल्ल पटेलही वाहनात बसून होते. परंतू लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे महत्व त्यांना नसावे, त्यामुळे त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी साधी विचारपूस न करता काच खाली करून पुढे असे होणार नाही असे आपल्या वाहनात बसूनच आश्वासन देत काढता पाय घेतला.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा नियोजन अधिकारी,जिल्हा माहिती अधिकारी,निवासी उपजिल्हाधिकारी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून पत्र परिषदेसाठी येण्याची विनंती केली. परंतू वारंवार अडवणूक करून झालेला अपमान हा लोकप्रतिनिधींच्या नाते प्रशासनातील असमन्वयाची बाब पालकमंत्र्यांपुढे मांडावी अशी भावना माध्यमांच्या प्रतिनिधींची होती. मात्र, राज्याचे गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही लोकशहीच्या चौथ्यास्तंभाचे महत्व त्यांना कळू नये हि बाब लाोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची अनादर करणारीच ठरत आहे.
सर्व सामान्यांचे काय…
पत्र परिषदेचे आमंत्रण देऊन थेट पत्रकारांचे अनादर करणे त्यातच पालकमंत्र्यांनी पत्रकारांना भेटण्याची तसदी न घेणे ही बाब पचणी पडण्यासारखी नसतानाच पत्रकारांशीच शासन प्रशासनाकडून अशाप्रकारचा व्यवहार होत असेल तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न या निमीत्ताने उपस्थित होत आहे.प्रेस ट्रस्टचे अध्यक्ष अपुर्व मेठी,श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल,हाजी अल्ताप शेख,संपादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत खंडेलवाल यांनी जिल्हाधिकारी यांची नेहमीची भूमिका असून पत्रकारांचा अवमान यापुढे खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका घेत पुढील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय पत्रपरिषदांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला.विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनाही आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आलेला होता.निवेदन द्यायला आलेल्या गोवारी समाजाच्या युवकांनाही पोलिसांनी जाऊ न दिल्याने त्यांनी घोषणाबाजी करीत विरोध नोंदवला.

खा. पटेल बघ्यांच्या भूमिकेत …
पत्रकारांनी पत्रपरिषदेवर बहिष्कार घालत पालकमंत्र्यांना प्रवेश द्वारावरच भेटण्याची भूमिका घेत प्रवेश द्वारावरच ठिय्या मांडला असता पालकमंत्री आपल्या वाहनाच्या बाहेर निघाले नाही. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या समवेत खा. प्रफूल्ल पटेलही वाहनात बसून होते, तर ते जिल्ह्याचे स्थानिक नेते असल्याने त्यांच्याकडून पत्रकारांना मोठ्या अपेक्षा होत्या मात्र, त्यांची कृतीही अपेक्षा भंग करणारी ठरली. ते केवळ बघ्याच्या भूमिकेतच दिसून आल्याने पत्रकारांमध्ये खा. पटेल विषयीही रोष दिसून आला.
ब्लॅकलिस्ट व माफीयांना प्रवेश…
पत्र परिषदेचे आमंत्रण देऊनही पत्रकारांना मुख्य प्रवेश द्वारावर अडविण्यात आले तर याच वेळी कोट्यवधीची रक्कम थकित असलेले राईस मिलर्स, दारू विक्रेता, वाळू विक्रेत्यांना प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे पालकमंत्री हे जिल्ह्याच्या विकासासाठी की स्वःविकासासाठी आले होते. अशा चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रंगल्या होत्या.

blank