
गोंदिया ता.1-आपल्याला पुन्हा कामावर घेण्यात यावे यासाठी मागच्या 19 जानेवारीपासून बिरसी येथील सुरक्षारक्षकांनी विमानतळ गेट समोर साखळी आंदोलनाला सुरुवात केले आहे. या आंदोलनाला तेरा दिवसाचा काळ उलटला तरी जिल्हा व विमानतळ प्रशासनाने या आंदोलनाची अद्यापही दखल न घेतल्यामुळे या आंदोलनकर्त्यांनी सोमवार पासून अनिश्चितकालीन अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.
तेरा वर्षे काम करूनही कोणतीही सूचना किंवा नोटीस न देता विमानतळ प्रशासनाने स्थानिक असलेल्या गरीब सुरक्षारक्षकांना कामावरून पूर्णतः बंद केले आहे. त्यामुळे या सर्वांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. वर्ष 2007 मध्ये याच विमानतळ प्रशासनाने स्थानिक नागरिकांना या प्रकल्पात अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते. हे विशेष. तरीपण आपण दिलेल्या आश्वासनाला गालबोट लावीत त्यांनी सर्व सुरक्षा रक्षकांना कामावरून बंद केले आहे. सदर सुरक्षारक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 19 जानेवारीपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. यादरम्यान अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपोषणाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे.दरम्यान शनिवारी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पंकज यादव, सुनील लांजेवार यांनीही आपल्या कार्यकर्ता सोबत भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.दरम्यान जिल्ह्याचे लोकनेते प्रफुल्ल पटेल हे रविवारी जिल्ह्यात आले असता त्यांनाही भेटून आंदोलनकर्त्यांनी आपली आपबीती कळविली. या दरम्यान जिल्ह्याचे खासदार तथा विमानतळ विकास व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मेंढे यांनी तीनदा सभेसाठी वेळ देऊनही त्यांनी येथे येण्याचे टाळले . त्यामुळे स्थानिक नागरिकात त्यांच्याविरुद्ध प्रमाणात रोष दिसून येत आहे. आत्ता आपल्याला न्याय मिळावा म्हणून या सुरक्षारक्षकांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. या अन्नत्याग आंदोलनात जर सुरक्षारक्षकांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर त्यास जिल्हा व विमानतळ प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.





