
अर्जुनी मोरगाव-शहरातील मुख्य मार्गावर दिवस-रात्र मोकाट जनावरे बसून असतात.वाहतुकीस अडथळा निर्माण होतो,मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.नागरिक आणि वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यापुढे रस्त्यावर मोकाट जनावरे दिसल्यास त्यांचे मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची भूमिका ठाणेदार महादेव तोदले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात घेतली आहे.
अर्जुनी तालुक्याचे ठिकाण आहे.बाजारपेठ,बँक,शासकीय कार्यालयामध्ये नेहमी वर्दळ असते.मुख्य बाजारपेठ असल्याने मोठ्या वाहनांची ये-जा असते.शहरातील मुख्य मार्ग,रेल्वे गेट,महाराणा प्रताप चौक,विज वितरण कार्यालय या मार्गावर पंधरा ते वीस मोकाट जनावरे दिवस-रात्र भटकत असतात.कित्येकदा ही जनावरे तासनतास मुख्य रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून असतात.यामुळे दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.अशा परिस्थितीत मोठी दुर्घटना होणे नाकारता येत नाही.परिसरातील गोपालक जनावरांना मोकाट सोडतात.ही जनावरे बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर बसून असतात त्यामुळे पादचार्यांना वाहतुकीला त्रास होतो.गोपालकांनी जनावरांना मोकाट सोडू नये.यापुढे रस्त्यावर ही मोकाट जनावरे आढळून आल्यास त्यांना जप्त करून गोपालकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची रोखठोक भूमिका ठाणेदार तोदले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात जाहीर केले. गोपालकांनी जनावरांची सोय करावी अन्यथा कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे




