राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळ्याला मुकाअ यांची वेब कास्टद्वारे उपस्थिती

0
52

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

* संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
* मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन 2017-18 च्या ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण
गोंदिया- गाव विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन 2017-18 च्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज 1 जुलै रोजी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री बनसोडे, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य सचिव संजय चहांदे, उपसचिव अभय महाजन आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात गोंदिया जिल्हय़ातून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता राजेश राठोड, शालेय स्वच्छता सल्लागार  भागचंद्र रहांगडाले यांनी वेब कास्ट द्वारे उपस्थित राहून सहभाग नोंदविला.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हे सन 2000 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. आज घडीला हे अभियान गावातील प्रत्येक वॉर्डपासून तर राज्यस्तरावर राबविले जात आहे. राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील अवनखेड ग्रामपंचायतीने पटकावले. ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य तसेच ग्रामसेवक यांना नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या हस्ते नागरी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी राज्य पातळीवर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक तसेच विशेष तीन पुरस्कार वितरण करण्यात आले.
गोंदिया जिल्ह्यातही सदर अभियान मोठ्या जोमाने राबविण्यात येत आहे. सन 2018-19 मध्ये जिल्हय़ातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध तसेच देवरी तालुक्यातील भागी या ग्रामपंचायती राज्यस्तरीय तपासणी साठी पात्र झाल्या आहेत. वेब कास्ट द्वारे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सर्व जिल्ह्यांनी सदर अभियान प्रभावी पणे राबविण्याचे आवाहन करण्यात आले.