
- कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन
वाशिम, दि. ०५ : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूने बाधित रुग्ण आढळून येत आहे. या विषाणूच्या संक्रमणाचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्या विषाणूतील बदल आणि त्यापासून होणारा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्याच्या दृष्टीने राज्यात जून २०२१ पासून ‘ब्रेक द चेन’ कालावधीतील ज्या बांधकाम कामगारांचे नोंदणी अर्ज मंजूर होवून सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, वाशिम यांचेकडून नोंदणी अर्ज मंजूर झालेले आहेत व या कार्यालयाकडून ओळखपत्र अर्थात स्मार्ट कार्ड देण्याबाबत एसएमएस प्राप्त झाले आहेत, असे बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात जिल्हा कार्यालयाकडे येत आहे. बांधकाम कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कोरोना प्रतिबंधक विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नाही. तरी बांधकाम कामगारांनी कार्यालयात गर्दी करु नये, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी श्री. नालींदे यांनी केले आहे.
ज्या बांधकाम कामगारांचे नोंदणी अर्ज यापूर्वीच मंजूर झालेले आहेत व त्या बांधकाम कामगारांनी नोंदणी फी व वर्गणीची रक्कम मंडळाच्या बँक खात्यात जमा केली आहे, अशा बांधकाम कामगारांचे ओळखपत्र अर्थात स्मार्टकार्ड फिल्ड एजन्ट, खास दूत, कुरीयर, पोस्ट ऑफीसमार्फत बांधकाम कामगांराना वितरीत करण्यात येतील. नोंदणी फी व वर्गणीची रक्कम मंडळ खाती जमा केलेली नाही अशा बांधकाम कामगारांना मे. आयटीआय लिमिटेड व मे. आरसीएस इन्फो प्रा.लि. या संस्थेकडून लघुसंदेश एसएमएसव्दारे पेमेंट लिंक पाठविण्यात आलेली आहे. सदर लिंकव्दारे बांधकाम कामगारांने पेमेंट गेटवे मार्फत नोंदणी फी व वर्गणीची फी मंडळ खाती जमा करताच नोंदणी क्रमांक व पुढील नुतनीकरणाचा दिनांक एसएमएसव्दारे कळविण्यात येत आहे. सदर नोंदणी क्रमांकाच्या आधारे बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑनलाईन पध्दतीने घेता येईल. सदर बांधकाम कामगारांना यथावकाश ओळखपत्र वितरीत करण्यात येईल.
मंडळामार्फत दि. ०९ जून २०२१ पासून नेांदणी फी व वर्गणीची रक्कम ऑनलाईन पध्दतीने पेमेंट गेटवे मार्फत भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. बांधकाम कामगारांना नोंदणी अर्ज मंजूर झाल्यानंतर मंडळामार्फत पाठविण्यात येणाऱ्या एसएमएसव्दारे सदर पेमेंट गेटवेची लिंक पाठविण्यात येत आहे. सदर लिंकचा वापर करुन बांधकाम कामगारांना नोंदणी फी व वर्गणीची रक्कम जमा झाल्यानंतर बांधकाम कामगारांना फी व वर्गणीची रक्कम जमा झाल्याची पावती व नोंदणी क्रमांकाच्या आधारे मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येईल. याकरीता तुर्तास ओळखपत्र स्मार्टकाडर्ची आवश्यकता राहणार नाही त्यामुळे ९ जून २०२१\ नंतर नोंदणी अर्ज मंजूर झालेल्या बांधकाम कामगारांना यथावकाश कार्यालयामार्फत फिल्ड एजन्ट अथवा खास दुतामार्फत ओळखपत्र वाटप करण्यात येईल.
सर्व बांधकाम कामगारांनी नेांदणी, नुतनीकरण व लाभाबाबत ऑनलाईन प्रक्रीयेचा लाभ घ्यावा व जिल्हा कार्यालयात बांधकाम कामगारांचा जमाव होणार नाही व कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव कालावधीत केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून जाहिर केलेल्या निर्बधांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे सरकारी कामगार अधिकारी गौरव नालींदे यांनी कळविले आहे.




