
जिल्हा वार्षिक योजना आढावा सभा
गोंदिया,दि.7 : जिल्ह्यातील विविध विकास योजनांची कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध होण्यासाठी संबंधीत विभागांनी आपले प्रस्ताव तात्काळ सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 7 ऑक्टोंबर रोजी जिल्हा नियोजन व विकास समितीची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी बैठकीत मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्रीमती गुंडे बोलत होत्या. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती कावेरी नाखले, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.मंगेश वानखडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अरुण सूर्यवंशी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्रीमती गुंडे यावेळी म्हणाल्या, जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 (सर्वसाधारण/अनुसूचित जाती उपयोजना/आदिवासी उपयोजना/आदिवासी उपयोजना क्षेत्रबाह्य) अंतर्गत या आर्थिक वर्षात काही विभागाचे निधी मागणी प्रस्ताव अजूनपर्यंत अप्राप्त आहेत, त्यामुळे संबंधीत विभागांनी आपले प्रस्ताव तातडीने सादर करावे. नक्षलग्रस्त
भागासाठी नाविण्यपूर्ण योजनेमध्ये प्रस्ताव सादर करावे. यंत्रणांना कामे करण्यासाठी बांधकाम विभागाने सहकार्य करावे असे सांगून श्रीमती गुंडे पुढे म्हणाल्या, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेण्यात यावे. आरोग्य विभागाने कोरोना लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सभेला उपवनसंरक्षक कुलराज सिंग, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदूराव चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व
बालकल्याण) संजय गणवीर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) के.वाय.सर्याम,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर, जिल्हा उपनिबंधक शुध्दोधनकांबळे, पशुसंवर्धन उपायुक्त श्री शंभरकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री मुशरफ, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे अधिक्षक सागर सोनारे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी तुकाराम बरगे, पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.




