
वाशिम, दि. 17 : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लस ही एकमेव उपाय आहे. जिल्हयात प्रशासन विविध यंत्रणांना सोबत घेवून पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी नियोजन करुन लसीकरण शिबीरांचे आयोजन करीत आहे. जिल्हयातील अनेक गावात पात्र व्यक्तींना लस देण्यासाठी विविध यंत्रणांचे कर्मचारी काम करीत आहे. अशातच प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशी अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र पांगराबंदी येथील आरोग्य सेविका श्रीमती रजनी शिरसाठ, मारसुळ उपकेंद्राच्या कंत्राटी आरोग्य सेविका श्रीमती मिनाक्षी घुगे, प्राथमिक आरोग्य मांगूळ झनक अंतर्गत येणाऱ्या मोठेगांव उपकेंद्राच्या आरोग्य सेविका श्रीमती रजनी नव्हाळे, प्राथमिक आरोग्य केंद्र मोप अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र वाकद येथील आरोग्य सेविका श्रीमती किरण हिवराळे व उपकेंद्र एकलासपूर येथील आरोग्य सेविका श्रीमती व्ही.आर. चुमडे हया दिलेल्या ठिकाणी लसीकरण सत्रास ठरवून दिलेल्या वेळेनुसार उपस्थित नव्हत्या. त्यामुळे कोविड लसीकरण सत्र उशिरा सुरु केल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांच्या लक्षात आले. त्यांच्या या लसीकरणातील हलगर्जीपणामुळे त्यादिवशी जिल्हयाचे लसीकरणाचे उद्दिष्ट टक्केवारीनुसार साध्य झाले नाही. त्यामुळे लसीकरणाचे लाभार्थी हे लसीकरणापासून वंचित राहिले.
जिल्हयामध्ये लसीकरण सत्र युध्दपातळीवर सुरु असतांना संबंधित आरोग्य सेविकांनी लसीकरण कार्यक्रमामध्ये अक्षम्य दुर्लक्ष केले आणि कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आल्याने त्यांना त्याबाबतचा खुलासा तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत पत्र मिळाल्यापासून 24 तासाच्या आत सादर करण्यास कळविले आहे. त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्यास अथवा अप्राप्त असल्यास त्यांच्याविरुध्द प्रशासकीय कारवाई करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या कारणे दाखवा नोटीस पत्रात नमूद केले आहे.




