
मंडला-मध्यप्रदेशच्या बुंदेलखंड भागातील जगप्रसिद्ध पन्ना खाणीत एका आदिवासी मजुराला 60 लाख रुपये किमतीचा 13 कॅरेटचा हिरा सापडला. मुलायमसिंह असे या आदिवासी मजुराचे नाव आहे. इतर काही मजुरांना वेगवेगळ्या वजनाचे सहा हिरे सापडले आहेत, असे अधिकार्यांनी सांगितले.
मुलायमसिंह यांना कृष्णा कल्याणपूर परिसरातील उथळ खाणीतून हा मौल्यवान दगड सापडला असून, या हिर्याचे वजन 13.54 कॅरेट असून, त्याची किंमत 60 लाख रुपये आहे. इतर मजुरांना सापडलेल्या वेगवेगळ्या वजनांच्या सहा हिर्यांपैकी दोन हिर्यांचे वजन अनुक्रमे 6 कॅरेट व 4 कॅरेट आहे, तर इतरांचे वजन अनुक्रमे 43, 37 आणि 74 सेंट आहे. या सर्व हिर्यांची एकूण किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. लिलावात खरी किंमत कळेल, असे हिरे निरीक्षक अनुपम सिंग यांनी सांगितले. हिर्याच्या लिलावातून मिळणारे पैसे मी माझ्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करणार असल्याचे आनंदित झालेला मुलायमसिंह म्हणाला.




