32.1 C
Gondiā
Wednesday, June 10, 2026
Home Top News बोदलकसा जलाशयात दोघे बुडाले,डोंग्यावरून उडी मारल्याने घडली घटना

बोदलकसा जलाशयात दोघे बुडाले,डोंग्यावरून उडी मारल्याने घडली घटना

0
11

तिरोडा ( जि. गोंदिया), ता. १० : तालुक्यातील रुस्तमपूर शिवारातील बोदलकसा जलाशय परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या नऊ युवकांच्या गटातील दोन युवक जलाशयात बुडाले. ही  घटना बुधवारी ( ता. १०) सायंकाळी घडली. डोंग्यात बसलेल्या सहापैकी चार जणांनी अचानक पाण्यात उडी मारल्याने डोंगा कलंडला. यात डोंग्यातील दोघे बुडाले. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू ठेवण्यात आले; मात्र अंधार आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे दोघांचा शोध लागला नसून गुरुवारी सकाळी ६ वाजेपासून पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.घटनेची माहिती मिळताच आमदार विजय रहागंडाले,जिल्हा परिषद सदस्य जगदिश बावनथडे,शैलेष नंदेश्वर,माजी जि.प.सदस्य मदन पटले यांनी घटनास्थळाकडे धाव घेत प्रशासनाला शोध मोहीम तातडीने राबविण्याच्या सुचना दिल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, बरबसपुरा येथील काही युवक बोदलकसा जलाशय परिसरात फिरण्यासाठी गेले होते. या गटात अक्षय नरेंद्र बिसेन, राकेश राधेशाम लाडे, निखिल इंदल पटले, लक्की संजय रहांगडाले, प्रलय राधेशाम पारधी, मनीष रमेश कोकूडे, अविनाश श्रावण टेकाम, मोहित वसंत रहांगडाले आणि कुणाल शालिकराम भोंडे यांचा समावेश होता.blank
यापैकी मोहित वसंत रहांगडाले आणि कुणाल शालिकराम भोंडे हे दोघे जलाशयाच्या पाण्यात बुडाले. याची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने जलाशयात शोधकार्य सुरू केले. मात्र, रात्रीचा अंधार वाढल्याने आणि जलाशयाचे विस्तीर्ण क्षेत्र लक्षात घेता दोघांचा शोध लागला नाही.
घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्ष तसेच तहसीलदार तिरोडा यांना देण्यात आली. त्यानंतर आपत्ती निवारण पथकाशी संपर्क साधण्यात आला. पथक प्रमुखांनी रात्रीच्या वेळी शोधमोहीम राबविणे धोकादायक व अवघड असल्याचे सांगत गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येईल, असे कळविले.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून युवकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जलाशय परिसरात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी गर्दी केली होती. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस अधिकारी, पोलिस पाटील, सरपंच तसेच गावकरी उपस्थित होते.पोलिस प्रशासनाकडून शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून बेपत्ता युवकांचा शोध घेण्यासाठी आपत्ती निवारण पथक, स्थानिक मच्छीमार आणि प्रशासनाचे कर्मचारी संयुक्तरीत्या प्रयत्न करीत आहेत.