
मुंबई,दि.24ः शिवसेना नेते रामदास कदम हे मंत्री अनिल परब यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे चर्चेत आहेत. दरम्यान राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यासाठी रामदास कदम विधानभवनात जात होते. मात्र पोलिसांनी त्यांना गेटवरच अडवले आहे. त्यामुळे कदम यांना विधिमंडळाच्या गेटवर काही काळ ताटकळत उभे राहावे लागले. आता आमदाराला पोलिसांनी का अडवले अशा प्रश्न उपस्थित होतो. मात्र आरटीपीसीआर चाचणीशिवाय कोणालाच विधान भवनात प्रवेश घेता येत नाही. कोरोनामुळे सदस्यांच्या सुरक्षेसाठी ही काळजी घेतली जाते आणि बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात येतो. हाच नियम माजी मंत्री रामदास कदमांसाठी देखील वापरण्यात आला.
आरटीपीसीआर चाचणीशिवाय कोणालाही प्रवेश नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनासाठी विषेश खबरदारी घेतली जात आहे. आरटीपीसीआर चाचणी केल्याशिवाय विधिमंडळात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. तसेच विधिमंडळात गर्दी होऊ नये यासाठी स्वीय सहाय्यकांना विधिमंडळाबाहेर उभारण्यात आलेल्या शेडमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून रामदास कदम यांना गेटवर कोरोनाची आरटीपीसीआर चाचणीबद्दल विचारले. यावेळी त्यांनी आरटीपीसीआर टेस्ट केली नसल्याने पोलिसांनी त्यांना गेटवरच अडवले. त्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनंतर रामदास कदमांची अँन्टिजेन चाचणी करण्यात आली आणि त्यांना विधानभवनात प्रवेश मिळाला.
कदमांचा सरकारला घरचा आहेर
रामदास कदमांची विधानभवनात एंट्री झाल्यानंतर त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपल्याच सरकारला हल्ला चढवला. त्यांनी खेड नगरपरिषदेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन थेट ठाकरे सरकारवर प्रश्न उपस्थित केले. मनसेचे नेते आणि खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना ताबडतोब निलंबित करा. अन्यथा कोर्टात जाईल, असा इशारा रामदास कदमांनी दिला.
ते तुमचे जावई आहेत का?
पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले की, नगराध्यक्षाने नगरपालिकेत अनेक भ्रष्टाचार केले आहेत. 20 प्रस्ताव केले. त्यांना अपात्र करण्यासाठी 50 टक्के नगरसेवकांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. 20 पैकी 11 मुद्द्यांमध्ये ते अपात्र होऊ शकतात, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आला आहे. नियमाप्रमाणे नगरविकास खात्याने 15 दिवसांमध्ये त्यांना अपात्र करायला हवे. मात्र दोन महिने झाले प्रस्ताव राखून ठेवण्यात आलाय. त्यांना अपात्र करण्यात येत नाही. 11 मुद्द्यावर भ्रष्टाचार केला हे सिद्ध झाले आहे. त्यांना पाठिशी का घालते जातेय? ते तुमचे जावई आहेत का? असा संतप्त सवाल रामदास कदमांनी आपल्याच सरकारला केला आहे.




