41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home Top News ऑफलाईन परिक्षेला विद्यार्थ्यांच्या विरोध; ऑनलाईन परिक्षा घेण्याची मागणी

ऑफलाईन परिक्षेला विद्यार्थ्यांच्या विरोध; ऑनलाईन परिक्षा घेण्याची मागणी

0
52

blank

मुंबई–दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परिक्षेचे वेळापत्रक देखील लवकरच जाहीर होणार आहेत. मात्र राज्य सरकारच्या परिक्षेच्या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे. राज्यात विविध ठिकाणी विद्यार्थी राज्य सरकारचा विरोध करत असून, आंदोलन देखील सुरू आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील घराबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.

तर तिकडे नागपुर आणि औरंगाबादमध्येही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच आहे. ऑफलाईन परिक्षा न घेता ऑनलाईन परिक्षा घ्यावी. अशी मागणी विद्यार्थ्यांनी लाऊन धरली आहे. या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी नागपूरच्या तुकडोजी चौकात आंदोलन केले. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने विद्यार्थ्यांनी चौकात उभी असलेली एक बस देखील फोडली आहे. विद्यार्थ्यांना भडवण्याचे काम कोण करत आहे. याचा शोध सध्या सुरू आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे कोण?
ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यात आज ठिकठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. त्यात धारावीत पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला. विद्यार्थ्यांना भडकवण्यामागे हिंदुस्थानी भाऊचा हात असल्याचे बोलले जात आहे. चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतरच विद्यार्थी आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे.

शिक्षणमंत्र्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
विद्यार्थी हे निरागस असतात, ही मुले अठरा वर्षांच्या खालील आहेत. हे विद्यार्थी एके ठिकाणी कोरोनाशी लढत आहेत, दुसऱ्या ठिकाणी अभ्यासाशी लढत आहेत, भविष्याच्या दृष्टीकोनातून विचार केला तर मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले आहे. भविष्यात या मुलांना त्रास होऊ नये म्हणून ही परीक्षा घेऊन अकरावी प्रवेश सुरुळीत करता यावा म्हणून हा आमचा उद्देश आहे. असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. पुढे त्या म्हणाल्या की, संघटनांचे काय म्हणणे आहे त्याविषयी आमच्यासोबत चर्चा करावी, आज दहावी आणि बारावीला तीस लाख विद्यार्थी आहेत. महाराष्ट्राच्या भौगलिक परिस्थितीचा विचार करावा आणि काय समस्या असतील तर आमच्याशी चर्चा करावी, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

“उद्या ते असंही म्हणतील तुम्ही शाळाच भरवू नका ; दहा-पंधरा जण रस्त्यावर आले म्हणजे…”

धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचं समोर आलं आहे. नागपुरात आंदोलक विद्यार्थ्यांकडून बसही फोडण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माध्यमांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बच्चू कडू यांनी सांगितलं की, “खरंतर हिंदुस्थानी राजा म्हणून कोणीतरी या आंदोलनाची सुरूवात केली होती. नेमकं त्यांच्या मागण्या ऑनलाईन परीक्षा घेऊ नका किंवा रद्द करा परीक्षा अशा काही मागण्या आहेत. आपण निश्चितच त्यांची नेमकी मागणी काय आहे आणि या आंदोलनाचं नेमकं कोणी नियोजन केलं हे पाहू. पण शिक्षण विभागाचं काम आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताचं काम करू. कोणी त्याची मागणी करण्याची गरज नाही. शिक्षण विभाग यामध्ये परीपूर्ण आहे. विद्यार्थ्यांचं भलं कसं होईल? त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया कसं जाणार नाही, याचाच आम्ही विचार करत आहोत.”तसेच, “दहा-पंधरा जण रस्त्यावर आले म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे असं बोलणं चुकीचं होईल. माध्यमांनी हे देखील पाहीलं पाहिजे. ५० विद्यार्थी नागपुरात जमा झाले आणि त्यांनी मागणी केली म्हणजे नागपुरमध्ये दोन लाख विद्यार्थी आहेत, त्यांचा विचार तुम्ही घेतला का? नाही घेतला. त्याची तपासणी करणं देखील फार महत्वाची आहे. १००-२०० विद्यार्थी रस्त्यावर येणार आणि ते सांगणार परीक्षा ऑनलाईन घेऊ नका, ते म्हणतात परीक्षाच घेऊ नका. उद्या ते असंही म्हणतील तुम्ही शाळाच भरवू नका, असं होणार नाही.” असंही यावेळी बच्च कडू यांनी स्पष्ट केलं. “ज्यांचा शिक्षणाशी संबंध नाही अशी काही चुकीचे माणसं कदाचित या आंदोलनाच्या मागे असू शकतात. परंतु आपण पडताळणीशिवाय हे सत्य मानणार नाही. विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीच्या वळणावर जाऊ नये. विद्यार्थ्यांनी एकाएकी हे आंदोलन केलेलं आहे. त्यांनी जर अगोदर निवेदन दिलं असतं तर कदाचित आपण त्यांना चर्चेला देखील बोलावलं असतं. पोलिसांना देखील आमचं सागणं आहे की त्यांनी हे आंदोलन अतिशय शांतपणे हाताळावं, कारण ते विद्यार्थी आहेत. त्यांना भविष्यात काही अडचण निर्माण होऊ नये, याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. आंदोलनाच्या मागण्यासंदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत.” अशी माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माध्यमांना दिली.