
देवरी,दि.1 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22
अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत उपविभागीय कृषि अधिकारी देवरी
यांचे वतीने पाच दिवसाचे राज्याअंतर्गत सहलीचे आयोजन करण्यात आले.
जिल्ह्यातील आदिवासी बहुल क्षेत्रात पारंपारिक पिकांना बगल
देण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्यातील विविध कृषि
संशोधन केंद्र तसेच शेतीवर आधारीत उद्योगधंदे, प्रक्रिया केंद्र
इत्यादींना भेटी देऊन व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून जे
नाविण्यपूर्ण उपक्रम राज्यामध्ये राबविले जाते त्यांची ओळख व्हावी व ते
प्रत्येक शेतकऱ्यांनी अंगीकार करुन शेतीमध्ये अमुलाग्र बदल घडवून शेतकरी
आर्थिकदृष्ट्या समृध्द व्हावे, असे प्रतिपादन देवरी उपविभागीय कृषि
अधिकारी मंगेश वावधने यांनी केले व हिरवी झेंडी दाखवून सहलीला प्रस्थान
करण्यात आले.
कृषि विज्ञान केंद्र खरपुडी येथील उच्च तंत्रज्ञानावर आधारीत
भाजीपाला लागवड, प्रक्षेत्र भेट, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी
येथे प्रक्षेत्र भेट, ॲग्रोव्हिजन कंपनी तथा जिरॉनियम शेती मौजा देहरे
यांच्या प्रकल्पास भेट, तसेच कृषि विज्ञान केंद्र बारामती येथे
प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. पुढील काळात गटशेती व शेतकरी
उत्पादक कंपन्या स्थापना करुन शेती करणे ही काळाची गरज आहे. गोंदिया
जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या अधिकाधिक सक्षम होण्यासाठी ‘विकेल ते
पिकेल’ या धर्तीवर आधारीत सुक्ष्म प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी
कृषि विभाग सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील. ‘चर्चा करु शेतीची – कास
धरु प्रगतीची’ ही ऑनलाईन वेबीनार मालिका देखील युट्युबच्या माध्यमातून
सुरु करण्यात आली आहे.
पारंपारीक शेती बरोबरच शेतकऱ्यांनी शेततळीमध्ये मत्स्य पालन,
अळींबी उत्पादन, कुक्कुट पालन, मधुमक्षिका पालन, तंत्रज्ञानावर आधारीत
भाजीपाला लागवड, बांधावर तसेच पडीत जमिनीवर फळबाग लागवड, मसाला पिके तसेच
शेतीवर आधारीत प्रक्रिया उद्योग जसे- दाळ मिल, मिनी राईस मिल, मुरमुरे व
पोहा उत्पादन, मिरची व हळद पावडर युनिट, पापड उद्योग यांचा जर
शेतकऱ्यांनी अवलंब केला तर उत्पादनात अधिक भर पडून आर्थिक स्थिती
सुधारण्यास मदत होईल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्षेत्रीय पातळीवर काम
करणारे कर्मचारी, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी,
तालुका कृषि अधिकारी तसेच आत्मा अंतर्गत काम करणारे बीटीएम व एटीएम यांनी
सहकार्य केले.





