
उच्च न्यायालयाचे आदेशानंतर सारस संवर्धनासाठी धडपड
गोंदिया,दि.02ःः- संपूर्ण महाराष्ट्रात फक्त गोंदिया-भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आढळणार्या सारस पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात सापडले आहे.या पार्श्वभूमीवर सारस पक्ष्याच्या संवर्धनासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तिन्ही जिल्ह्यात सारस संवर्धन समितीचे गठण करण्यात आले असून या समितीने आपले काम सुरू केले आहे. सारस संवर्धनासाठी आता प्रशासनाचा थेट सहभाग राहणार असल्याने सारस संवर्धनात कितपत यश येते, याकडे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे सारस संवर्धनात गेल्या एक दशकाहून अधिक काळापासून काही जागृत युवक काम करीत आहेत.या संस्थेच्या कार्याला बघूनच पहिल्यांदा तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ.विजय सुर्यवंशी यांनी या सारस महोत्सवाच्या माध्यमातून सारस संवर्धनाला सुरवात केली होती,त्यानंतरचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनीही त्याची जोपासना करण्याचे प्रयत्न करतांना एका विशिष्ठासोबतच काम न करता त्यांनी अनेकांना सोबत घेत स्वतःनिरिक्षणस्थळी जाऊन काम केले होते.त्यांच्यानंतर मात्र जिल्हा प्रशासन सारस संवर्धनासाठी पाहिजे तसे सहकार्य करीत नसल्याने सारसांच्या संख्येत घट होऊ लागली तर वनविभाग व कृषीविभागाने शेतकरी व नागरिकात जी जागृत शासन प्रशासन म्हणून करायला हवी होती,ती न केल्याने न्यायालयाच्या माध्यमातून यासाठी धाव घेण्याची वेळ सारस प्रेमींवर आली,हे सुध्दा तेवढेच सत्य आहे.
न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर झोपलेल्या जिल्हा प्रशासनाला जाग आली असून आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून जनजागृती रथ काढून आम्ही संवर्धनासाठी लोंकामध्ये जात असल्याचे सांगितले जात आहे.परंतु खरंच तो रथ त्या गावात गेल्यानंतर काही फरक पडला का याचा विचार अद्याप कुणी केलेला नाही.त्यातच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातूनच शेकडो पानाची पुस्तक काढून संवर्धन होणार काय़ अशा प्रश्न उपस्थित झालेला आहे.गेल्या अनेक दशकापांसून निस्वार्थ काम करणारे युवक आहेत,त्यांच्याकडे असे अनेक छायाचित्रही असतील की ते अप्रतिम राहू शकतात.परंतु प्रशासनाला सुध्दा सारस संवर्धनासाठी मोजक्याच पण नेहमीची सलाम ठोकून पुढे पुढे येणार्यांची गरज दिसून येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाने सारसाचे छायाचित्र आमंत्रित केले होते,जिल्ह्यातील 15-20 वन्यजीवप्रेमी असलेल्या छायाचित्रकारांनी म्हणे छायाचित्रही पोचते केले होते,परंतु त्यातील एक दोन छायाचित्रकारांचीच छायाचित्रे निवडून इतरांचे छायाचित्र नाकारण्यात आल्याच्या चर्चांनी वेग घेतला असतांनाच एकाच छायाचित्रकाराची छायाचित्र त्या पुस्तकात सर्वाधिक संख्येने निवड होणे योगायोग की इतरांच्या छायाचित्रात ते आकर्षण नाही हे सुध्दा महत्वाचे आहे.सारस संवर्धनासाठी जर आपण काम करतोय तर यात जिल्हा प्रशासनाला सर्वांनाच नव्हे तर अधिकाधिक संख्येतील छायाचित्रकार,अभ्यासक,स्वयंसेवकांना धरुनच काम केल्यास सारस सवंर्धन हा विषय जनसामान्यांच्या होऊ शकतो.अन्यथा न्यायालयाचे निर्देश आहेत,म्हणून सारस संवर्धन करायचे हा विचार असेल तर आपण कितीही जनजागृती रथ फिरवा किंवा पुस्तक काढून ग्रंथालयाची शोभा वाढवा त्यांने काहीही होणार नाही. सर्वांना सोबतीने म्हणण्यापेक्षा आम्ही आणि आमचे निवडक प्रेमी यां भूमिकेतून जिल्हा प्रशासन काढत असलेल्या सारस संवर्धन पुस्तिकेला खरंच महत्व राहणार काय,हा सुध्दा चर्चेचा विषय झालेला आहे.काही काळापुर्वी नागझिरा-नवेगावबांधमधील छायाचित्र म्हटली की जिल्हाप्रशासन असो की अधिकारी एकाच व्यक्तींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून त्यांच्याशिवाय कुणीच वन्यजीवछायाचित्रकार नसल्याची जाणीव करुन देत होते,त्यात मात्र काहीवेळांनी हळूहळू बदल होऊ लागला होता.परंतु आत्ता परत तीच री जिल्हा प्रशासनात ओढली जाऊ लागल्याने नवख्यांच्या छायाचित्रकलेसोबतच त्यांनी अनुभवलेल्या अभ्यासाला महत्व नाहीच चित्र दिसून येत आहे.
सुमारे तीन दशकांपूर्वी गोंदिया – भंडारा व चंद्रपूर आणि लगत असलेल्या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात सारस पक्षी आढळायचे. लहानमोठय़ा बोड्या, तलाव आणि नदीकाठावर त्यांचे अस्तित्व असायचे. परंतु, नंतरच्या काळात पीक पद्धतीत बदल झाले. पिकांवर रासायनीक खतांचा मारा सुरू झाला. सारस पक्षी जमिनीवर अंडी देत असल्याने त्यांची अंडी पळविण्याच्या घटना वाढल्या. जैवविविधता बदलली. अतिउच्च दाबाच्या वीज तारांमुळे पक्षी मृत्यूमुखी पडू लागले. पक्ष्यांची शिकार झाली. त्यामुळे त्यांची संख्या रोडावत गेली. पक्ष्यांना अपेक्षित वातावरण न मिळाल्याने त्यांच्या अधिवासावर परिणाम पडला. त्यामुळे त्यांचा अधिवास वारंवार बदलत गेला. परिणामी, शहरी भागातून त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले. आता हे पक्षी नदी किनार्यावरील महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सिमेवर आढळून येतात. माहितीनुसार, महाराष्ट्रात आज केवळ 40 सारस पक्षी उरले आहेत. त्यापैकी गोंदिया 35 भंडारा 4, आणि चंद्रपूर 1 अशी पक्षीसंख्या आहे. विदर्भात 103 सारस पक्षी होते. ती आता घटून 40 झाली आहे. तर हि संख्या सतत घटत असल्याचे अभ्यासात आढळले आहे. सारस पक्षी संकटग्रस्त श्रेणीत आणि वन्यजीव अधिनियमानुसार शेड्यूल 4 मध्ये येतो. अशा या संकटग्रस्त पक्षाच्या संवर्धनासाठी विविध माध्यमातून वारंवार सरकारचे लक्ष वेधण्यात आले. परंतु, सरकारने त्याची दखल घेतली नाही. अखेरीस उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दखल घेऊन सारस संवर्धन समिती तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आता गोंदिया,भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात ही समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून विविध विभागाच्या अधिकार्यांसह एनजीओंचे प्रतिनिधी सहभागी आहेत. तसेच काही आमंत्रित सदस्यसुद्धा या समितीमध्ये सहभागी करुन घेण्याची मूभा आहे.
सारस पक्षाचे वैशिष्टय
सारस पक्षी हा अधिक वजनाचा उडू शकणारा जगातील एकमेव पक्षी आहे. त्याची उंची 5 फुट आणि पंखांची लांबी 8 फुट, वजन 7 किलो असू शकते. हे पक्षी आयुष्यभर जोडी करून राहतात आणि वर्षातून पावसाळ्यात केवळ 2 अंडी देतात. कित्येक कि.मी.वरून पक्षांचा मोठा आवाज ऐकायला येतो. लाल मान आणि डोके असलेल्या या पक्षांचा जीवनकाळ जवळजवळ 20 वर्षाचा असतो.
समितीचे कार्य
सारस संवर्धन समिती स्थापन झाल्यानंतर ही समिती संबंधित जिल्ह्यातील सारसांच्या अधिवासाचा आढावा घेईल. त्यानंतर संवर्धन आराखडा (अँक्शन प्लॅन) तयार केला जाईल. आतापर्यंत एनजीओंच्या माध्यमातून सारस संवर्धनाचे प्रयत्न सुरू होते.आता यात प्रशासनाचा थेट सहभाग राहणार असल्याने सारस पक्षांचे संर्वधन होऊन त्यांची संख्या वाढण्याची आशा आहे. समिती स्थापन झाल्यानंतर त्यांच्या नियमित सभा होणे आवश्यक आहे. चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील समितींची एक सभा पार पडली. परंतु, भंडारा जिल्ह्यात उशिरा समितीची स्थापन करण्यात आली. त्यातही या जिल्ह्यात अद्याप एकही सभा होऊ शकली नाही.
मागील वर्षी होते 88 सारस
गोंदिया-भंडारा-बालाघाट जिल्ह्यात कार्यरत सेवा संस्थेच्या पुढाकाराने 13 जून ते 19 जून 2021 या कालावधीत गोंदिया, भंडारा आणि बालाघाट जिल्ह्यात सारस पक्ष्यांची गणना करण्यात आली. सारस पक्ष्यांचे अधिवास असलेल्या 70 ते 80 ठिकाणी सेवा संस्था, सारस मित्र आणि गोंदिया व बालाघाट जिल्ह्यातील वन अधिकारी आणि कर्मचारी गणनेत सहभागी झाले होते.या गणनेत बालाघाट जिल्ह्यात 47, गोंदिया जिल्ह्यात 39 आणि भंडारा जिल्ह्यात केवळ 2 सारस पक्ष्यांची नोंद करण्यात आली होती.




