
बेरार टाईम्समध्ये बातमी प्रकाशित होताच रेंगेपार पांढरी येथील नागरिकांनी रोखून धरले अवैध सागवन लाकुड नेणारे ट्रॅक्टर
**अधिकाऱ्यांचे संगनमताने कुरण जंगलात अवैध वृक्षतोड प्रकरण
सडकअर्जुनी:--अधिका-यांचे संगनमताने कुरण जंगलात अवैध वृक्षतोड याबाबत बेरार टाईम्स मध्ये बातमी प्रकाशित झाल्यानंतर वनविभाग खळबळून जागे झाले.आणि प्रकरण अंगलट येईल म्हणून कुरण जंगलातील अवैधरित्या वृक्षतोड केलेल्या लाकडांचा पंचनामा व हातोडा न मारता होळीच्या दिवशी १८ मार्च ला रात्री १ वाजेदरम्यान सागवन लाकडांची विल्हेवाट व प्रकरण दाबण्याचे प्रयत्न वनकर्मचारी करीत असतांनी रेंगेपार पांढरी येथील नागरिकांनी सदर लाकुड वाहतुक करणारे ट्रॅक्टर रोखून धरले.आता याप्रकरणात काय कारवाई होते याकडे रेंगेपार वासियांचे लक्ष लागून आहे.
सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अंतर्गत सहवनक्षेत्र कोसमतोंडी बीट गोंगले रेगेंपार अंतर्गत गट नं. २०५ पूर्व दिशा जितलाल अंबुले रेंगेपार यांचे शेतातील सागवन झाडांची विनापरवानगीने कटाई करण्यात आली होती.यांचे शेताला लागून उत्तर दिशेला कुरण जंगल आहे.त्या कुरण जंगलातील सागवन झाडे अवैधरित्या कापण्यात आले होते.सदर अवैध कापलेले सागवन झाडे रेंगेपार येथील गावाचे पश्चिम दिशेला डोंडू टेंभरे यांचे घराजवळील रोडापासून २०० मी.वर सरकारी कुरण जंगलातील सागवन झाडे कापले होते. सदर झाडे फेब्रुवारी महिन्यात कापून सुद्धा आजपावेतो वनविभागाने कोणतीच कारवाई केली नाही.या अवैध वृक्षतोड प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.याबाबत क्षेत्रसहाय्यक कोसमतोंडी एस.झेड.वलथरे यांना विचारणा केली असता याबाबत मला काहीही माहिती नाही.पाहणी करून कारवाई करू नेमके प्रकरण काय आहे असे बोलून मोकळे झाले.मात्र आता प्रकरण अंगलट येईल म्हणून अवैध कटाईचे सागवन लाकडे होळीच्या दिवशी रात्री १२.३० ते १ वाजे दरम्यान विल्हेवाट व प्रकरण दाबण्यासाठी अंदाजे १५ वनकर्मचारी यांनी लाकडे ट्रॅक्टर मध्ये भरून लंपास करण्याचे प्रयत्नात होते. याचा गावकऱ्यांना सुगावा लागताच रेंगेपार पांढरी येथील गावकऱ्यांनी सदर ट्रॅक्टर अडवून या लाकडांचा पंचनामा केला आहे काय? अशी विचारणा केल्यावर वनकर्मचा-यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.आणि काही वनकर्मचा-यांनी तिथून काढता पाय घेतला व पसार झाले.त्यामुळे गावकऱ्यांनी सागवन जातीचे लाकडे असलेला ट्रॅक्टर रोखून धरला.
याप्रकरणाची चाहूल लागताच सदर प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले.आणि याप्रकरणाबाबत गावकऱ्यांना विचारपूस केली.तेव्हा कोणीही अधिकारी घटनास्थळी नव्हते.त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मडावी व इतर वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.गावक-यांनी संबंधित महिला बीटरक्षक बिसेन यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.त्यातच एक अवैध रेतीचा ट्रॅक्टर देखील विना कारवाई करता सोडून दिल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
संतप्त गावकऱ्यांनी महिला बीटरक्षकावर रोष व्यक्त केला आहे.घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मडावी आल्यावर याप्रकरणात योग्य तपास करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले,तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना ट्रॅक्टर सुपूर्द केले.तर रात्रीला गस्तीवर असतांना लाकुड दिसले ते चोरी होऊ नये म्हणून विना पंचनामा करता लाकूड वाहतूक करून डव्वा डेपोला जमा करित असल्याचे सांगितले.मात्र याप्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात येत होते.एकंदरीत वनकर्मचा-यांना वाचविण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे गावकऱ्यांचे लक्षात आले.या सर्व प्रकरणात नेमका मास्टर माईंड कोण? ते अधिक तपासातून समोर येईल.
याप्रकरणात ठेकेदाराकडून वनकर्मचा-यांनी देवाण घेवाण करून विनापरवानगीने शेतातील माल नेऊ दिल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे.ठेकेदाराने विनापरवानगीने माल नेला असून कुरण जंगलात अवैध वृक्षतोड याबाबत वृत्तपत्रात बातमी प्रकाशित होताच उरलेल्या मालाची विल्हेवाट लावण्याचे वनकर्मचा-यांचे प्रयत्न होते.
**वनकर्मचा-यांकडून देवाण घेवाण करून जंगलातील नाल्यातील रेतीचा अवैध उपसा जोमात*
*सहवनक्षेत्र कोसमतोंडी अंतर्गत बीट गोंगले,रेंगेपार रेतीचा अवैध उपसा होत असून रेती तस्करी रोखण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी अपयशी ठरले आहेत.या बीट अंतर्गत वनरक्षट नागपुरे,वनमजूर ढबाले,वनमजूर नरेश वैद्य यांचे रेतीतस्करासोबत संगनमत असून जंगलातील नाल्यातील रेतीचा उपसा करून खुलेआम रेतीचा व्यवसाय जोमात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे आजही जंगलातील नाल्यातील रेतीचा नाल्याला लागून मिरची वाड्या असून या वाड्यालगत रेतीचे ढिग करून ठेवले आहेत.मागिल तीन महिन्यांपासून जंगलातील नाल्यातील अवैध रेती वाहतूक केली जात आहे.तसेच या बीट अंतर्गत जितलाल अंबुले यांचे शेतातील सागवन झाडे विनापरवानगीने नेण्यात आले.यामध्ये ठेकेदाराकडून पैसै घेऊन विनापरवानगीने लाकडे नेऊ दिल्याचे समजते.तसेच विटा भट्टी मालकांकडून वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे नाव समोर करून त्यांचेकडून वसुली करण्याचा गोरखधंदा वनरक्षक नागपूरे, वनमजूर ढबाले , वनमजूर नरेश वैद्य यांचा सुरु अाहे.जितलाल अंबुले यांचे शेतातील सागवन झाडे विना परवानगीने ठेकेदाराने नेल्याची चर्चा असून याप्रकरणात वनकर्मचा-यांनी ठेकेदारासोबत आर्थिक व्यवहार केले असल्याची माहिती आहे.या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.यापूर्वी सन२०१७ मध्ये सहवनक्षेत्र कोसमतोंडी अंतर्गत मुरपार लेंडेझरी येथील आदिवासी व गैरआदिवासी यांचे गटातील सागवानाची अवैध कटाई करण्यात आली होती. याप्रकरणात क्षेत्रसहाय्यक ,बीटगार्ड व वनमजूर यांना निलंबित करण्यात आले होते.बीट गोंगले,रेंगेपार येथील अवैध वृक्षतोड, जंगलातील नाल्यातून अवैध रेतीचा उपसा आणि विटभट्टी मालकांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव समोर करून देवाण घेवाण करण्याचा गोरखधंदा सुरू असून याची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वनप्रेमी भामा चु-हे यांनी केली आहे.




