
गडचिरोली,दि.25मार्च– गडचिरोली पोलीस दलात १५० पोलीस शिपाई, १६१ पोलीस शिपाई चालक व देसाईगंज एसआरपीएफ गट क्रमांक १३ मधील १०५ पदे अशी एकूण ४१६ पदे भरण्यासाठी गृह विभागाने मंजुरी दिली असून ही पदे थेट पोलीस घटक स्तरावरून भरण्यात येणार आहे. या शासन निर्णयामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात अनेक पोलीस पदे रिक्त असूनही मागील तीन वर्षापासून पोलीस भरती घेण्यात्य आली नाही. गडचिरोली दौऱ्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या काही तरुण तरुणींनी ही बाब लक्षात आणून दिली होती. त्यावेळी त्यांनी ही बाब राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निदर्शनास आणून देऊन पाठपुराव केला व गृह विभागाने ही भरती प्रक्रिया सुरू करण्याला मंजुरी दिली असून रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस भरती राबविण्याची जबाबदारी शासनाने टीसीएस, आयबीपीएस, एमकेसीएल यांच्याकडे सोपविली होती. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरती यातून वगळण्यात आली ही पदे भरण्याची प्रक्रिया थेट पोलीस घटक स्तरावरून राबविण्यात येणार आहे.
मागील तीन वर्षांपासून पोलीस भरती झाली नसल्याने जिल्ह्यातील अनेक युवक पोलीस भरतीची प्रतीक्षा करीत आहेत. पोलीस भरती निघेल या आशेवर अनेक जण तयारीसुद्धा करीत होते. मात्र भरती होत नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली होती. मात्र नवीन शासन निर्णयामुळे युवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.




