
गोंदिया,दि.31 : राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रम अंतर्गत बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात जिल्हास्तरीय राष्ट्रीय पोषआहार पुनर्वसन केंद्र तर्फे 20 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान पोषण पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त 30 मार्च रोजी किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी व रक्तक्षय निर्मूलन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन गोंदिया मेडिकल कॉलेजच्या प्रसूती विभागाच्या प्राध्यापक डॉ.गरीमा बग्गा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शिका वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर, नगरसेविका भावना कदम, एन आर सी च्या आहार समुपदेशिका स्वाती बनसोड, नर्सिंग ऑफिसर रेणूका साहू प्रामुख्याने उपस्थित होत्या.
20 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान आयोजित पोषण पंधरवाडा बाबत विस्तृत माहिती देताना वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले की, किशोरवयीन मुलींमध्ये रक्त अल्पता व कॅल्शियमची कमी दिसून येत आहे. म्हणून
शाळकरी मुलींचे मोफत हिमोग्लोबीन रक्त तपासणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर ऍनिमिया ग्रस्त किशोरवयीन मुलींना लोहयुक्त गोळ्या व मोफत औषधी देण्यात येत आहे. शहरी भागातील झोपडपट्टीतून आरोग्य जन जागृती कार्यक्रम आयोजित करून मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येत आहे.
यावेळी उद्घाटिका प्रसुती तज्ञ प्राध्यापक डॉ.गरिमा बग्गा यांनी सांगितले की, गोंदिया सारख्या आदिवासी व दुर्गम भागातून रेफर होऊन उपचार घेणाऱ्या गर्भवती महिलांमध्ये 60℅ रक्तक्षयाचे प्रमाण दिसून येते. त्यांचे वजन सुद्धा कमीच असते, त्यामुळे जन्माला येणारी नवजात शिशु बऱ्याचदा अशक्त व कमजोर व जन्मतः कुपोषित असतात. त्यामुळे बालमृत्यू व मातामृत्यू टाळायचे असतील तर किशोरवयीन मुलींचे रक्तक्षय उपचार करणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी कुटुंबियांनी देखील आरोग्य साक्षर होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ.गरिमा बग्गा यांनी यावेळी केले.
नगरसेविका भावना कदम यांनी यावेळी एन आर सी मध्ये भरती बालकांना पौष्टीक आहार व केळीचे वाटप केले.
पोषण पंधरवाडा निमित्त रक्तक्षय निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत 73 किशोरींचे हिमोग्लोबीनचे प्रमाण व सिकलसेल तपासणी करण्यात आली. रक्त अल्पता असणाऱ्या किशोरींचा उपचार डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी केला व स्वाती बनसोड यांनी संतुलीत आहार बाबत विस्तृत मार्गदर्शन केले. रक्त तपासणीसाठी श्री.नायकाने व नितु फुले यांनी सहकार्य केले. श्रीमती राहुलकर व रजनी वैद्य व एन आर सी च्या स्टाफ यांनी कॅम्प यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.





