
- आयुक्तांच्या बैठकीत माहिती
- सर्व विभागाचे नियोजन
- यंत्रणांना सतर्कतेचे आदेश
गोंदिया,दि.12 : यावर्षी मान्सून लवकर येणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असून जिल्ह्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. मान्सून पूर्व आढावा बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा मुख्यालयासह तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा सुद्धा तयार करण्यात आला आहे. पूर परिस्थितीत सर्व यंत्रणा समन्वयाने काम करतील अशी माहिती अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी नागपूर विभागीय आयुक्तांच्या आढावा बैठकीत दिली.
विभागीय आयुक्त माधवी खोडे यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर विभागाची मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक दुरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीत गोंदिया जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीची विस्तृत माहिती सादर करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनाली सोनुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन.टी.लभाने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष वर्षभर कार्यान्वित असतो. त्याचप्रमाणे पोलीस मुख्यालय व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एक जूनपासून नियंत्रण कक्षातील मनुष्यबळ वाढविण्यात येणार आहे. पूर काळात साथरोग पसरू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे औषध साठा पुरेशा प्रमाणात ठेवण्यात येणार आहे. जुन्या इमारतीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे विजेच्या तारांवर वृक्ष कोसळून वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटना असतात. अशा घटनांबाबत सतर्क बाळगून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. पुरामुळे जनावर दगावली जातात याबाबत पशुसंवर्धन विभागाला निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन दल व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलासोबत समन्वय ठेवून पूर परिस्थिती हाताळण्यात येणार आहे. पुरामुळे विस्थापित होणाऱ्या नागरिकांसाठी तात्पुरते निवारा गृह शोधून ठेवले आहेत. याबाबत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना सतर्क राहण्याच्या लेखी सूचना निर्गमीत केल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली.
गोंदिया जिल्ह्यात ९६ गावे पुरप्रवण असून या गावात विशेष उपाययोजना असलेला आराखडा तयार केला आहे. या गावांसाठी पर्यायी मार्गांची यादी तयार सुद्धा तयार केली आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांना अधिकारी भेटी देऊन पाहणी करणार आहेत. मान्सून तसेच आपत्तीच्या वेळेस आदर्श प्रणालीची कार्यपद्धती अद्ययावत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. अतिवृष्टी व पुराची माहिती नागरिकांना देण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जाणार आहे.
गोंदिया जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारी बाबत विभागीय आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. मामा तलावाच्या पाळ फुटून पाणी गावात शिरल्याच्या घटना घडत असतात याबाबत सतर्कता बाळगण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. संपूर्ण संपर्क तुटणाऱ्या गावात किमान तीन महिने पुरेल एवढा अन्न व औषध साठा करून ठेवावा असे त्या म्हणाल्या. पूर प्रवण गावातील गरोदर महिला तसेच पावसाळ्यात प्रसूती तारीख असणाऱ्या महिलांची यादी तयार करून त्यांना वेळीच रुग्णालयात दाखल करून घ्यावे. अतिवृष्टीचा अंदाज व प्रसूती तारीख या एकाच वेळी असल्यास अशा महिलांना खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच दाखल करून घेण्याच्या सूचना त्यानी दिल्या. या बैठकीत आयुक्तांनी अनेक महत्वाचे निर्देश दिले.




