
एक हात मदतीचा -एक लक्ष रुपये शिष्यवृत्तीचे वितरण
गोंदिया ता.18:-महापुरुषांचे विचार हे आध्यत्मिक आणि भावनात्मक नसतात म्हणूनच बुद्धाने केलेली क्रांती ही महान क्रांती असून त्यांचे आंदोलन हे व्यवस्था परिवर्तनाचे जनक होते.असा युक्तीवाद बालाघाटचे बौद्ध धम्म प्रचारक इंजिनियर किशोर बारमाटे यांनी (ता.17) केला.
श्री बारमाटे हे, ईथल्या भीमनगरच्या मैदानावर आयोजित बुद्ध जयंती कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व. सामाजिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीच्या अध्यक्ष सविता ताई उके या होत्या.मंचावर रेल्वेचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील,डॉ. मनोज राऊत, पोलीस निरीक्षक तेजेंद्र मेश्राम,ऍड आनंद बोरकर,OBC समाज कार्यकर्ते श्री चव्हाण आणि जिल्हा निबंधक( सहकार) शुदधोधन कांबळे उपस्थित होते.
श्री बारमाटे पुढे बोलताना म्हणाले की, बुद्धाच्या तत्वज्ञानाचा अभ्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला,असे सांगून बुद्धाच्या क्रांतीचे तत्वज्ञान समजण्या साठी प्रत्येक व्यक्तीने तीन ग्रंथाचे वाचन करण्याचा आग्रह त्यांनी केला यामध्ये पहिले ग्रंथ,’भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’, दुसरे ग्रंथ ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ आणि तिसरे ग्रंथ ‘क्रांती आणि प्रतीक्रांती ‘ या तीन ग्रंथांचा अभ्यास करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. प्रतीक्रांतीची व्याख्या करून बारमाटे म्हणाले प्रतीक्रांती म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक परिवर्तन होय.सम्राट अशोकांनी धार्मिक प्रतीक्रांती करून बुद्धाचा संदेश पोचविण्यासाठी आपली मुलं महेंद्र आणि संघमित्रा यांना श्रीलंकेला पाठविले. बुद्धाने आपल्यासाठी कोणतेही स्थान निश्चित करून ठेवली नाही. नैतिकतेची पूजा करून आदर्श समाज व्यवस्था निर्माण करणे आणि मानवतेचे कल्याण करण्याची त्यांची शिकवण होती असे ते म्हणाले. हिच बुद्धाची सामानतेची शिकवण संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अंगीकार करून भारतीय संविधानात सामाविस्ट केली. त्यानंतर नैतिकतेच्या आधारावर मान्यवर कांशीराम साहेबांनी आंदोलन उभं केलं. एका बाजूला बुद्ध शाहू फुले आंबेडकर यांनी मानवीय मूल्य जोपासण्याची प्रतीक्रांती केली असून दुसऱ्या बाजूला हिंदूराष्ट्र निर्माण करण्याची प्रतीक्रांती येथील प्रस्थापित समाज व्यवस्था करीत आहे,तिला हाणून पाडण्याची गरज आहे असे ते म्हणाले.यावेळी पोलीस निरीक्षक मेश्राम यांनीही मार्गदर्शन केलं.
दरम्यान ‘एक हात मदतीचा’या अंतर्गत समाजातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना रुपये एक लक्ष स्कालरशिप वाटप करण्यात येणार आहे. यासाठी मोठया प्रमाणात दानदात्यांनी आपली राशी समितीला सप्रेमभेट दिली आहे. दरम्यान सामान्य ज्ञान परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरस्कार वाटप करण्यात आले. शिलवंत सोनटक्के यांनी भीमगीतांची मैफिल सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. एल. मेश्राम यांनी, संचालन आयुष्मती समता गणवीर यांनी तर विलास वासनिक यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करून सहकार्य केले.
(पृथ्वीराज कोल्हटकर )





