राज्यव्यापी उद्यमिता यात्रेमध्ये सहभागी होऊन नवउद्योजकांना प्रशिक्षणाचा लाभ घेण्याची संधी

0
14
  • २६ ते २८ मे प्रशिक्षण आयोजित

गोंदिया,दि.24 :  महाराष्ट्र राज्यामध्ये युथ एड फाउंडेशन संस्था, पुणे यांचेमार्फत राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे आयोजन करण्यांत आलेले आहे. उद्यमिता यात्रा १० मे, २०२२ पासून मुंबई येथुन सुरु झाली असून राज्यातील जिल्ह्यामधुन जनजागृती करत ही यात्रा २६ मे, २०२२ रोजी सकाळी १० वाजता गोंदिया येथे दाखल होणार आहे. त्याअनुषंगाने गोंदिया जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम २६ मे, २०२२ ते २८ मे, २०२२ पर्यंत जिल्हा परिषद सभागृह, गोंदिया येथे आयोजीत केलेला आहे.

         या उद्यमिता यात्रेमध्ये जिल्ह्यामधील तळागाळातील उमेदवारांचे समुपदेशन करुन स्वयंरोजगार सुरु करण्याकरीता युथ एड फाउंडेशन संस्थेमार्फत बीज भांडवल प्रदान करण्यात येत आहे. तसेच तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात नवउद्योजकांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यात येईल. त्यामुळे युवकांचा कौशल्य विकास, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी, नवनवीन संकल्पनांना प्रोत्साहन देणा-या स्टार्टअपचा विकास या माध्यमातून राज्याच्या शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे.

        तरी प्रोत्साहन व मार्गदर्शन प्राप्त होण्यासाठी जास्तीत जास्त नवउद्योजकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया चे सहायक आयुक्त रा. ना. माटे यांनी केलेले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत, दुसरा माळा, रुम नं. २१०, आमगांव रोड, गोंदिया-४४१६०१ दुरध्वनी क्रमांक ०७१८२-२९९१५० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा कृपया कार्यालयात संपर्क करण्यात यावा. असे आवाहन  सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रा. ना. माटे यांनी केले आहे.