वैशिष्ट्यपूर्ण एकस स्तंभी उड्डाणपुलाचे लोकार्पण तसेच तिरोडा – गोंदिया व आमगांव – गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन

0
73

गोंदिया:::केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते उद्या लोकार्पण होत असलेल्या साकोली आणि लाखनी येथील उड्डाणपुल वैविध्यपूर्ण असून मध्यभागी स्तंभ उभारून त्यावर निर्माण केलेला हा पूल आपले वेगळे महत्त्व सांगणारा आहे. या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ज्याची प्रतीक्षा होती त्या उड्डाण पुलाच्या लोकार्पणाचा दिवस येऊन ठेपला. उद्या केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते लाखनी आणि साकोली येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण मंत्रीमहोदयांच्या हस्ते होणार आहे. वाहतुकीला होणारी अडचण आणि अपघाताचे प्रमाण पाहता या गावकऱ्यांची गरज होती ती केंद्रीय मंत्र्यांच्या पुढाकारातून उद्या पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर केवळ मध्यभागी एक स्तंभ देऊन सहापदरी तयार करण्यात आलेले हे दोन्ही उड्डाणपूल आपले वेगळे महत्त्व सांगणारे आहेत. एका स्तंभावर उभारण्यात आलेला हा भारतातील पहिला उड्डाणपूल असल्याचे समजते. विस्तीर्ण अशा सहा पदरी पुलावर करण्यात आलेली पथदिव्यांची मांडणी, पुलाच्या खाली तयार करण्यात आलेला बगीचा आणि करण्यात आलेले वृक्षारोपण या पुलाचे सौंदर्य अधिक खुलविणारा आहे.
या पूलाप्रमाणेच गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा – गोंदिया या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम आहे.
28 किमी लांबीच्या या महामार्गासाठी 239 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या मार्गावर एक उड्डाणपूल उभारला जाणार असून 9 छोटे पूल तयार करण्यात येणार आहे. गोंदिया शहरातून जात असलेल्या या महामार्गावर उड्डाणपुलावर विद्युत व्यवस्था असणार आहे. आमगाव – गोंदिया या राष्ट्रीय महामार्गाची लांबी 20.75 किमी असून यासाठी 288 कोटीचा खर्च केला जाणार आहे. यादरम्यान रेल्वे रुळावर उड्डाणपूल तयार केला जाणार असून तो चार पदरी असणार आहेत. एक मोठा आणि चार छोटे पूल या मार्गावर राहणार आहेत. महामार्गाला लागून असलेल्या गावांसाठी बस स्थानक आणि रस्त्याची निर्मिती केली जाणार आहे.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशा दोन्ही कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते उद्या 29 मे रोजी होणार आहे. आपण सर्वाँनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे..