धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून द्या;खासदार मेंढे यांची केंद्रीय सचिवांशी भेट

0
31

 गोंदिया,दि. 18 :- राज्य शासनाच्या चुकीच्या माहितीच्या आधारावर भंडारा, गोंदिया जिल्ह्याला दिलेले रब्बी धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे या मागणीसाठी खासदार सुनील मेंढे यांनी सार्वजनिक वितरण विभागाचे केंद्रीय सचिव सुधांशू पांडे यांची भेट घेतली. त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे पांडे यांनी आश्‍वासन दिले.
मागील चार दिवसांपूर्वीच भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप आणि असंतोषाचे वातावरण आहे. राज्य शासनाने पेरणीच्या दिलेल्या चुकीच्या आणि अपूर्ण माहितीमुळे केंद्राकडून राज्याला धान खरेदीचे उद्दिष्ट दिले गेले. त्याचा परिणाम म्हणून शेतकर्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार सुनील मेंढे यांनी दिल्ली येथे जाऊन सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांची भेट घेतली व वास्तविक परिस्थिती समजावून सांगितली.
राज्य सरकारने दिलेल्या चुकीच्या व अर्धवट माहितीवर केंद्राने रब्बी हंगाम २0२२ साठी २७ लाख ५0 हजार क्विंटल राज्याला धान खरेदीचे उद्दिष्ट दिले. दिलेले अत्यंत कमी उद्दिष्ट चार दिवसांपूर्वीच पूर्ण झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे, असे खा.मेंढे यांनी सांगितले. २0२0-२१ मध्ये पेरणी क्षेत्र हे १,१८,२0६ हेक्टर होते. त्यावेळी राज्याने ५३ लाख १४ हजार ७६0 क्विंटलचे धान खरेदी केले. मात्र २0२१-२२ मध्ये पेरणीचे क्षेत्र १,२९,0२९ हेक्टर असतानाही खरेदीची उद्दिष्ट मात्र २७ लाख ५0 हजार क्विंटल दिले गेले. जे मागील वर्षीपेक्षा जवळपास अध्र्याने कमी आहे. हा विरोधाभास असून राज्य शासन आणि पाठविलेल्या चुकीच्या माहितीमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे २0२१-२२ चे पेरणी क्षेत्र आणि २0२0-२१ मध्ये झालेल्या खरेदीची आकडेवारी लक्षात घेता भंडारा-गोंदिया जिल्ह्यासाठी धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी यावेळी केली. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्‍वासन पांडे यांनी दिले.