महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिंदे बुधवारी रेडिसन ब्लू हॉटेलमधून कामाख्या मंदिरात पोहोचले. त्यांच्यासोबत तीन ते चार आमदार दिसले. मंदिरात शिंदे यांनी आरती करून पूजा केली. उद्या होणाऱ्या फ्लोअर टेस्टसाठी मुंबईला रवाना होणार असल्याचे शिंदे यांनी मंदिराबाहेर पत्रकारांना सांगितले.


अविश्वास प्रस्ताव घेऊन फडणवीस रात्री उशिरा राजभवनात पोहोचले
तत्पूर्वी, मंगळवारी रात्री उशिरा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांनी उद्धव सरकारच्या विरोधात फ्लोअर टेस्टची मागणी करत राजभवन गाठले. राज्यपालांनी फ्लोअर टेस्टची नोटीस दिल्यास उद्धव सरकार सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते.
26 जून रोजी सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना, उपाध्यक्ष, महाराष्ट्र पोलीस आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली होती. याप्रकरणी न्यायालयाची पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे.
उद्धव सरकार अल्पमतात, बहुमत सिद्ध करा
मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. येथून ते सायंकाळी मुंबईत पोहोचले आणि आमदारांसह राज्यपालांची भेट घेण्यासाठी गेले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस राजभवनाबाहेर म्हणाले- उद्धव सरकार अल्पमतात आहे, बहुमत सिद्ध करावे.
शिंदे यांच्यामागील महासत्ता समोर आली – काँग्रेस
फडणवीस राजभवनात पोहोचताच राज्यात काँग्रेस आक्रमक झाली. पक्षनेते सचिन सावंत म्हणाले- एकनाथ शिंदे यांच्यामागील महासत्ता समोर आली आहे. प्रत्यक्षात 24 जून रोजी गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये शिंदे यांनी बंडखोर आमदारांना सांगितले की, आमच्याकडे महासत्ता आहे, उद्धव सरकार पडेल.
राज्यपालांना दिलेल्या पत्रातील मुद्दे
- भाजपा-शिवसेनेने एकत्रितपणे निवडणुका लढविल्या होत्या. परंतू निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले.
- शिवसेनेत गेल्या 8-9 दिवसांपासून अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे आणि त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आता आघाडी नको आहे. शिवसेनेचे 39 आमदार ही आघाडी संपुष्टात येण्याच्या बाजूने आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बहुमत गमावले आहे.
- दुसरीकडे शिवसेनेच्या या आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यांचे 40 मृतदेह गुवाहाटीतून परत येतील, असे जाहीरपणे राज्यसभा सदस्य संजय राऊत सांगत आहेत. शिवाय शिवसेनेचे इतरही नेते अशाच प्रकारची धमकीयुक्त भाषा वापरत आहे. यासंदर्भात सर्व पुरावे सोबत जोडले आहेत.
- संसदीय लोकशाहीत सभागृहातील बहुमत ही सर्वोच्च बाब असल्याने आणि त्याशिवाय, ते सरकार अस्तित्त्वात राहू शकत नसल्याने तातडीने मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, ही माझी राज्यपालांकडे विनंती आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे विविध दाखले सुद्धा देण्यात आले आहेत.
व्हायरल पत्र चुकीचे- राजभवन
‘गुरुवारी फ्लोअर टेस्ट’चे ‘राज्यपालांचे पत्र’ व्हायरल झाल्यानंतर, राजभवनाने मुद्दा फेटाळलाभाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भेट घेतल्यानंतर, गुरुवारी फ्लोर टेस्टचे आदेश देणारे ‘राज्यपालांचे पत्र’ इंटरनेटवर व्हायरल झाले. मात्र, राजभवनने असे कोणतेही पत्र जारी केल्याचा इन्कार केला आहे.
कथित पत्र व्हायरल झाल्याने खळबळ
ही घडामोड सुरू असताना राज्यपालांचे विशेष अधिवेशन बोलावण्यासंबंधीचे एक पत्र राज्यात चांगलेच व्हायरल झाले. काही माध्यमांनी या पत्राच्या आधारावर गुरुवारी ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा असल्याचे वृत्त दिले. पण, अद्याप या पत्राची पुष्टी झाली नाही.
राज्यपाल-फडणवीसांत काय झाली चर्चा?
फडणवीस यांनी राज्यपालांसमोर उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात असल्याचे सांगीतले. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलवण्याची त्यांनी राज्यपालांकडे मागणी केली. ईमेल आणि प्रत्यक्ष बंडखोरांनी ठाकरे सरकारचे बहुमत काढले आहे त्यामुळे बहुमत चाचणी घ्यावी अशी मागणी फडणवीसांनी राज्यपालांकडे केली. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना निर्देश देत बहुमत सिद्ध करावे असेही त्यांनी राज्यपालांकडे विनंती केली. याबाबत खुद्द फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
17 ते 18 आमदार संपर्कात – विनायक राऊत
मातोश्रीवर शिवसेनेची सुरू असलेली आमदारांची आणि प्रमुख नेत्यांची बैठक संपली. त्यानंतर विनायक राऊत यांनी कमीत कमी 17 ते 18 आमदार संपर्कात आहेत. असा दावा केला आहे. तर विरोधी पक्षाचे नेते राज्यपालांना भेटण्यासाठी गेले असे पत्रकारांनी विचारले असता, जे होईल ते बघू असे उत्तर विनायक राऊतांनी दिले आहे.
फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट
दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यानंतर रात्री आठ वाजता मुंबईत परतल्यानंतर फडणवीसांनी राजभवन गाठत राज्यापालांची भेट घेतली आहे. ही आत्ताची सर्वात मोठी घडामोड असून प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन आदी भाजप नेतेही फडणवीसांसोबत आहेत. तसेच प्रसिद्ध विधिज्ञ महेश जेठमलानी यांनीही त्यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेतली आहे.
भाजप नेत्यांचा ताफा राजभवनात

बंडखोर मविआचा पाठींबा काढणार?
बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालायात याचिका दाखल केली होती. आता महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा काढल्याची याचिकेची प्रत राज्यपालांना देणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
फडणवीसांची 7 दिवसांत पाचवेळा दिल्लीवारी
आठवडाभरापासून सूरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात आणखीनच सस्पेंस वाढत असून राज्याचे राजकारण कोणत्या पातळीवर आणि सत्ता कुणाच्या पारड्यात पडणार हे मात्र निश्चित नाही. विशेष म्हणजे सत्तेचे मुख्य केंद्रबिंदू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याचेही बाब समोर आली आहे. या सत्तासंघर्षात कमालीचे गप्प राहीलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सात दिवसांत पाचव्यांदा दिल्लीवारी केली हे विशेषः अर्थात भाजपकडूनही सत्तांतराच्या हालचाली मोठ्या प्रमाणात सूरु असल्याचेच हे द्योतक आहे.
लाइव्ह अपडेट्स :
- शिवसेना आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांची मातोश्रीवर बैठक
- अमीत शहा, नड्डांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल, थेट पोहचले सागर बंगल्यावर
- एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे. त्यांचा बाप काढायचा, तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय? एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्राला ट्विटद्वारे उत्तर.

- अजून वेळ गेलेली नाही. भूलथापांना बळी न पडता समोर येऊन बोला, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुवाहातील बंडखोरांना पत्रातून केले आहे.
- ठाण्याच्या माजी महापौर आणि जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठेवला ठपका.
- आमदारांवर कुठलिही जबरदस्ती नाही. सर्व आमदार आनंदात. 50 जण स्वेच्छेने आले. कुणावरही जबरदस्ती नाही. एकनाथ शिंदे यांचा गुवाहाटीत दावा. तर दुसरीकडे भाजप नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहचले.
- मी आजही शिवसेनेतच आहे, असे स्पष्टीकरण गुवाहाटीमध्ये दाखल झालेले शिवसेना आमदार उदय सामंत यांनी दिले आहे. गुवाहाटी येथे बसून सामंत यांनी एक व्हिडीओ तयार केला आहे. त्यात ते म्हणतात की, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे.
- पिंपरी चिंचवडमध्ये बंडखोर शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. हे बॅनर कोणी लावले, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, काही शिवसैनिकांचा बंडखोर आमदारांना पाठिंबा असल्याची माहिती.

- सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला, अशा सूत्रांचा हवाला देत अशा बातम्या प्रकाशित होत आहेत. मात्र, ह्या निव्वळ भूलथापा आहेत.उद्धव साहेब ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये, असे शिवसेना जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी कळवले आहे.
- एकाही आमदाराला डांबून ठेवलेलं नाही, बंडखोर गटातील दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण
- दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेत. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते अशोक चव्हाणही आहेत. तिन्ही नेत्यांत राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंडखोरांना दिलेल्या 14 दिवसांच्या संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची आहे.