गोंदिया,दि.18ः देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या स्मृती नागरीकांच्या मनात तेवत राहाव्यात तसेच स्वातंत्र्य लढयातील अज्ञात नायक/ क्रांतीकारक व घडलेल्या विविध घटनांचे स्मरण होवून देशभक्तीची भावना जनमाणसात कायमस्वरुपी राहावी याच उद्देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘ हर घर तिरंगा ’ हा उपक्रम जिल्हयात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घरावर,शासकीय व निमशासकीय तसेच विविध खाजगी आस्थापनांवर तिरंगा ध्वज लावण्याच्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी आज 18 जुलै रोजी ‘ हर घर तिरंगा ’ उपक्रम राबविण्याबाबत आयोजित पत्रपरिषदेत केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.नितिन वानखेडे,जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.अमरिश मोहबे,अति.जिल्हाधिकारी सुतार,महावितरणचे अधिक्षक अभियंता शरद वानखेडे उपस्थित होते.
‘ हर घर तिरंगा ’ या उपक्रमासाठी जिल्हयाला 3 लक्षपेक्षा जास्त तिरंगा ध्वजाची आवश्यकता आहे.प्रत्येक विभागाने काही तिरंगा ध्वज खरेदी करण्याचे नियोजन करुन ध्वज गावातील ग्रामपंचायत,रेशन दुकान,ग्रामसंघ,उमेद व माविमच्या दुकानामध्ये तसेच शहरात नगरपरिषद,महावितरण कार्यालय,महाराष्ट्र जिवन प्राधिकरण कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले.पूर्वी हा उपक्रम 11 ते 17 ऑगस्ट 2022 दरम्यान राबवायचा होता. आता हा उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवायचा आहे.या उपक्रमासाठी नागरीकांनी स्वईच्छेने ध्वज खरेदी करावा.जे ध्वज खरेदी करु शकणार नाही त्यांना तिरंगा ध्वज भेट म्हणून दयावे.विविध विभागाअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदारांना ध्वज खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करावे.तसेच अधिकारी-कर्मचारी यांनी देखील स्वईच्छेने वर्गणी गोळा करुन ध्वज खरेदी करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी यावेळी सांगितले.जिल्ह्यात 2लाख 91 हजार व शहरात 85 हजार कुटुंबांची घरे असून यासह आस्थापना,सहकारी संस्था,शासकीय कार्यालयावर अमृत महोत्सवानिमित्त झेंडा फडकावयाचे आहे,हे एैच्छिक स्वरुपाचे आहे.जिल्ह्यात झेंडे उपलब्ध करुन देण्याची जबाबादारी उमेद व माविमच्या बचतगटांकडे सोपवण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.
हा उपक्रम 11 ते 17 ऑगस्ट ऐवजी आता 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे.विविध विभागांनी, सेवाभावी संस्था,विविध संघटनांनी ध्वज खरेदी करण्यासाठी स्वईच्छेने निधी गोळा करावा असे सांगितले.