
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून रोज कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने धान पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत अर्जुनी- मोरगाव तालुका प्रशासनाने दखल घेतली असून शुक्रवार, 29 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी डॉ.विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार विनोद मेश्राम यांनी आपल्या सहकार्यांसह पांढरवाणी रै. व भिवखिडकी परिसरातील नुकसानग्रस्त धान पिकांची प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. तालुक्यात गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून अतिवृष्टीसह रिमझिम पाऊस पडत आहे. सर्वत्र नदीनाले ओसंडून वाहत आहेत. नदीनाल्याच्या काठावरील शेती पुराच्या पाण्याने वेढल्याने धानाच्या प-ह्यासह मोठ्या प्रमाणात रोवनीसुध्दा सडलेली आहे. त्यामुळे शेतक-यांवर नैसर्गिक संकट उदभवले असून तालुक्यात शेकडो हेक्टर शेतजमीन पडीत राहण्याचे संकट आहे.
तालुक्यात पांढरवाणी रयत, भिवखिडकी, सावरटोला, बोरटोला, महागाव, सिरोली, बोरी अशा अनेक गावात प-हे आणि झालेली रोवणी सडल्याने व दुबार पेरणी होवू शकत नसल्याने धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाबरोबरच निसर्गानेही शेतक-यांची साथ सोडल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी माजी मंत्री राजकुमार बडोले, आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी पूरग्रस्त व नुकसानग्रस्त शेतीची पहाणी केली व ही बाब तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच त्वरित पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत देण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना केल्या.
उपविभागीय अधिकारी डॉ.विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार विनोद मेश्राम, तलाठी रंगारी, चचाने, सर्व कृषी सहाय्यक व इतर कर्मचारी यांच्यासह शुक्रवारी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करुन, सर्व्हे करुन त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले.





