
भंडारा- एका महिलेवर ३0 जुलै ते २ ऑगस्ट या दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव व भंडारा जिल्ह्यातील कान्हाळमोह येथे अमानुष अत्याचार झाला. नराधमांनी तिला गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते. पहाटे व्यायामासाठी गेलेल्या तरुणांना ही महिला दिसली. सध्या ही पिडीता नागपूर येथे मृत्यूशी झुंज देत आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणापेक्षाही गंभीर आहे. या घटनेतील पिडीतेला त्वरित न्याय मिळावा यासाठी आरोपींवरील खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, तसेच या घटनेतील नराधमांना कठोरातील कठोर म्हणजे फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चा द्वारा जिल्हा पोलिस प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर खासदार सुनील मेंढे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
खा. मेंढे म्हणाले, पिडीत महिलेला एवढय़ा गंभीर जखमा झाल्या होत्या की, भंडारा येथे अत्याधुनिक सुविधा नसल्याने, तिला नागपूरला नेण्याशिवाय पर्याय नव्हता. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याशी संपर्क करून जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध व्हावी म्हणून, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, असे खासदार मेंढे यांनी नमूद केले.
बलात्कारासारख्या घटनांमध्ये पिडीतेला तातडीने न्याय मिळावा अशी समाजातील सर्वांची अपेक्षा असते. त्यानुसार हा खटला जलदगती न्यायालयात चालावा व दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस प्रशासनाला सूचना देऊन या घटनेतील तपासाकरिता एसआयटी नेमण्यात आली आहे व प्रमुख पदी सक्षम महिला पोलिस अधिकार्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील या घटनेची दखल घेतली असून त्यामुळे पिडीतेला त्वरित न्याय मिळेल अशी अपेक्षा जनतेच्या मनात निर्माण झाली असल्याचा आशावाद मेंढे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी भाजप जिल्हा अध्यक्ष शिवराम गिर्हेपुंजे, नागपूरचे माजी महापौर अर्चना डहानकर, भाजप महिला जिल्हा अध्यक्ष इंद्रायणी कापगते, आशावरी देशमुख, विनोद बांते, गीता कोंडेवार, माला बगमारे, प्रमिला लांजेवार, मंजिरी पनवेलकर, युगकांता रहांगडाले, रोशनी पडोळे, मधुरा मदनकर, गिता सिडाम, आशा उईके, वनिता कुथे, भूमेश्वरी बोरकर, चंद्रकला भोपे, लता चौधरी, कल्याणी निखाडे, रोहिणी आस्वले, मनीषा कुथे, शोभा लांजेवार, माधुरी नखाते तसेच महिला मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.





