
तुमसर: तालुक्यातील डोंगरी बुजरूक येथे मॉयल कंपनी विरोध बाळापूर येथील ग्रामस्थांनी किसान गर्जनेच्या नेतृत्वात बाळापूर ते डोंगरी खाणीपर्यंत मोर्चा काढत साखळी उपोषण सुरु केले. भारत सरकारचा उपक्रम अंतर्गत ही खाण येत असून या खाणीतून जगप्रसिद्ध मॅग्नीजचे उत्खनन करण्यात येते. किसान गर्जनाचे संस्थापक राजेंद्र पटले, पंचायत समितीचे उपसभापती शेखर कोतपल्लीवार, किसान सभेचे राज्य सचिव माधवराव बांते, आयटकचे राज्य सचिव शिवकुमार गणवीर, धर्मेंद्र धकेता, अशोक उईके, विलास आडकिने, वसंत रावतीया यांच्यासह मोर्चामध्ये शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.
एक एकर शेती द्या एकाला मॉयलमध्ये नोकरी देऊ अशी भूमिका घेत मॉयल प्रशासनाने जागा हस्तांतरण सुरु केले. मात्र तीन एकर जागा घेऊनही कुटुंबातील दोनच लोकांना नोकरी दिली. तर तिसऱ्याला नोकरी देण्याकरिता मॉयल प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप गावकरी करत आहेत.
सन १९९४ पासून बाळापूर कॅम्पमध्ये ग्रामस्थ राहत असून मॉयलने सन २००९ ला येथे मॉईलने सदनिका तयार केले. मात्र आज येथे होणाऱ्या उत्खननांचा त्रास कर्मचाऱ्यांसोबतच ग्रामस्थांनाही होत आहे. मॉईल प्रशासन ब्लास्टींगची निर्धारित वेळ असताना केव्हाही ब्लास्टींग करीत आहे. यामुळे गावकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे.सततच्या होणाऱ्या ब्लास्टींगमुळे गावातील घरांना आणि शाळेला सुद्धा तडे गेल्यामुळे जीव धोक्यात आला आहे.




