
भंडारा-महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजातील विद्याथी, बेरोजगार तरुण व शेतकरी यांच्या समस्या सोडविण्याचे मागणी ओबीसी सेवा संघातर्फे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षांना निवेदन देवून केली आहे.
राज्यातील बहुसंख्य असलेल्या ओबीसी, एनटीव्हीजे, एसबीसी समाजातील विद्यार्थी, बेरोजगार तरुण, शेतकरी, कर्मचारी अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. वेळोवेळी ओबीसी सेवा संघ व समाजाच्या इतर संघटना विविध आंदोलने व निदर्शने करीत असतात. परंतु शासनाने त्यांच्या मागण्याकडे कायम दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ओबीसी समाजात शासनाप्रती प्रचंड असंतोष पसरलेला आहे. बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रात ओबीसीची जातीनिहाय जनगणना करणे, ओबीसी विद्यार्थ्यांच्या ७२ वसतीगृहाचे तात्काळ बांधकाम सुरु करणे, बांधकाम होईपर्यंत स्वाधार योजना त्वरित लागू करणे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सन २0१९/२0 पासून घोषित मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती त्वरित प्रदान करणे व चालू शैक्षणिक वर्षाची शिष्यवृत्ती वेळेत विद्यार्थ्यांना प्रदान करणे, महाज्योती मार्फत देण्यात येणारे प्रवेश पूर्व प्रशिक्षण शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी सुरु करणे, महाज्योतितील व्यवस्थापकीय संचालक पद स्वतंत्र प्रभाराचे (स्थायी) नेमावे, अशा विविध मागण्याचे निवेदन महाराष्ट राज्य मागासवर्गाचे अध्यक्ष यांना देण्यात आले. यावेळी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष गोपाल सेलोकर, रमेश शहारे, संजीव बोरकर, संजय मते, दयाराम आकरे, जिवन भजनकर, यशवंत सुर्यवंशी उपस्थित होते.