
रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उदघाटन
गोंदिया,दि.11 : वाहने आधुनिक झाली तसा त्यांचा वेगही वाढला आहे. मात्र वाहतूक नियमांचे पालन न करणे व वेगाने वाहन चालविल्यामळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वेगापेक्षा मानवाचा जीव महत्वाचा असून वाहन चालवितांना नियमांचे पालन करा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी केले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात त्या बोलत होत्या. रस्ता सुरक्षा अभियानाचा हिरवी झेंडी दाखवून त्यांनी शुभारंभ केला.
दिनांक 11 ते 17 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येणार असून या कालावधीमध्ये नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती व प्रबोधन करण्यात येणार आहे. या अभियानाचे उदघाटन जिल्हाधिकारी कार्यालय येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्मिता बेलपात्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा महेश बनसोडे, मोटार वाहन निरीक्षक व ड्रायव्हींग स्कूलचे संचालक व प्रतिनिधी उपस्थित होते.
या अभियानादरम्यान चौकसभा, माहितीपत्रके वाटप, शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन व विशेष अंमलबजावणी मोहिम या सारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी “वाहतुकीचे नियम पाळुन अपघात टाळावेत” असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात येत आहे.





