
तिरोडा : पालडोंगरी येथील शेतकऱ्यांच्या शेत गटातून मुंबई-नागपूर-झारसुगुडा नैसर्गिक गॅस पाईपलाईन जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीचे नुकसान होत आहे. या सुपीक जमिनीची नुकसान भरपाई मिळावी याकरिता शेतकऱ्यांनी 10 ऑक्टोबर 2022 ला आक्षेप अर्ज (हरकत अर्ज) सक्षम प्राधिकारी यांचे कार्यालय मुंबई यांना पाठविले होते. या अर्जामध्ये विविध मागण्या करण्यात आलेल्या होत्या.
प्रति एकरी 25 लाख रुपये प्रमाणे आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी.गॅस पाईपलाईनचे काम करताना ज्या शेतकऱ्यांच्या शेत गटातून पाईपलाईन जाते, त्या शेतकऱ्यांना मजुरी करता प्रथम प्राधान्य देण्यात यावे. मजुरी, कंत्राटी व कायमस्वरूपातील कामगार व कर्मचारी स्थानिक क्षेत्रातील घेण्यात यावे.काम पूर्ण झाल्यावर पाच वर्षापर्यंत शेतकऱ्यांच्या शेत जमिनीची मोफत मरम्मत करण्यात यावी.शेत जमिनीवर असलेल्या झाडांची कापणी झाल्यास योग्य मोबदला देण्यात यावा.
सदर सर्व मागण्या मंजूर न झाल्यास शेतकरी शेत गटामध्ये आत्मदहन केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. अशा प्रकारचे हरकत अर्ज पालडोंगरी व भुराटोला गावातील 83 लोकांनी केले होते.याची प्रतिलिपी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार, आमदार, तहसीलदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य, पंतप्रधान, गृहमंत्री भारत सरकार, प्रफुल पटेल, प्रवीण पटले जि.प. सदस्य व ग्रामपंचायत कार्यालय पालडोंगरी यांना देण्यात आली होती.
स्थानिक प्रतिनिधी फक्त मत मागण्यापुरते…
यावर स्थानिक प्रतिनिधी व राजकीय क्षेत्रात फक्त पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत 19 ऑक्टोंबर 2022 ला निवेदनात विशद केलेली बाब तपासून आपल्या स्तरावरून नियमानुसार योग्य कारवाई करावी व अहवाल कळवावे, असे निर्देश उपजिल्हाधिकारी तथा सक्षम अधिकारी गेल इंडिया सीबीडी बेलापूर यांना दिले होते. याची प्रत तहसीलदार व शेतकऱ्यांना दिले होते. मात्र इतर प्रतिनिधी फक्त मत मागण्या पुरतेच मर्यादित का??? त्यांनी अजूनही कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची मुलाखत किंवा शेतकऱ्यांच्या हितार्थ साधे मागणी पत्र सुद्धा पाठविलेले नाही. फक्त मतं मागण्याकरता येतात व आम्ही असे करू तसे करू करतात, अशी चर्चा गावात रंगली आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीचे बातमी 19 डिसेंबर 2022 ला एका न्यूज पोर्टलवर प्रकाशित करण्यात आली होती. त्या बातमीची दखल म्हणून 28 डिसेंबर 2022 ला सक्षम प्राधिकारी यांनी शेतकऱ्यांना नोटीस देऊन 12 जानेवारी 2023 ला दुपारी दोन वाजता पंचायत समिती सभागृह येथे सुनावणी ठेवलेली आहे. सुनावणीच्या वेळी येताना आपण स्वतः अथवा आपले अधिकृत प्रतिनिधी यांनी आपल्याकडील मूळ कागदपत्रासह वेळेत हजर राहावे. आपण अथवा आपले अधिकृत प्रतिनिधी वरील दिवशी व वेळी हजर न राहिल्यास आपणास काही सांगावयाचे नाही असे गृहीत धरून पुढील योग्य ती कार्यवाही या कार्यालयाकडून करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी अशा प्रकारची नोटीस शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष होणाऱ्या सुनावणीकडे लागले आहे.




