41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News देशात हुकूमशहाने जन्म घेतलाय तर आत्महत्या नको संघटित व्हा-शेतकरी नेते राकेश टिकैत

देशात हुकूमशहाने जन्म घेतलाय तर आत्महत्या नको संघटित व्हा-शेतकरी नेते राकेश टिकैत

0
54

blank

नागपूर : : ज्या देशातील विरोधी पक्ष हा कमजोर असतो,त्या देशात हुकूमशाही जन्माला येते आणि आपल्या देशात
हुकूमशाहीने जन्म घेतला आहे, अशी टीका राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी येथे केली.सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नागपुरातील प्रशिक्षण केंद्रात नकली मुस्लीम, हिंदू, शिखांची निर्मिती केली जाते, असा गंभीर आरोप राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी केला. बहुजन संघर्ष समितीच्या वतीने नागपुरातील देशपांडे सभागृहात आयोजित शेतकरी रॅलीत ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने मंचावर बहुजन संघर्ष समितीचे नागेश चौधरी, माजी मंत्री सुनील केदार आणि इतरही शेतकरी नेते उपस्थित होते.

सोबतच आत्महत्या करून प्रश्न मिटणार नाही.लढावे लागले.तेव्हा आत्महत्या करू नका,आंदोलनात सहभागी व्हा,असे
आवाहन टिकैत यांनी विदर्भातील शेतकऱ्यांना केले,तसेच खासगीकरणाच्या विरोधात सुरू असलेल्या वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला व स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनालाही त्यांनी आपले समर्थन जाहीर केले.blank

टिकैत म्हणाले, ‘आरएसएस’च्या केंद्रात तयार होणाऱ्या या नकली मुस्लीम, हिंदू, शिखांना मग वेगवेगळ्या धर्मांच्या समितीवर नेमले जाते. हा प्रकार सर्वांची विचारधारा बदलण्याचा प्रयत्न आहे. या लोकांना येत्या ५० ते १०० वर्षांत देशाचा इतिहासही बदलायचा आहे. केंद्रातील सत्ताधारी व ‘आरएसएस’ला संविधान आणि कायदा मान्य नाही. त्यांना कोणत्याही स्थितीत सत्ता हवी आहे. त्यासाठीच मध्यप्रदेश व महाराष्ट्रात निवडून आलेल्या सरकारला उलटवून त्यांनी कशी सत्ता मिळवली लोकांनी बघितले. चांगल्या देशासाठी विपक्ष मजबूत हवा. विरोधी पक्ष कमकुवत झाल्यास हुकूमशहाचा जन्म होतो. भारतातही त्याची सुरुवात झाली आहे.

दिल्लीत १३ महिने शेतकऱ्यांचे आंदोलन चालले; परंतु या आंदोलनात शेकडो लोक मारले जातील,याची अधिकाऱ्यांना आधीच कल्पना होती.या सरकारने हे षडयंत्र आधीच रचले होते.या देशातून शेतकरीच हद्दपार करण्याचे षडयंत्र आहे.त्यासाठीच तीन कृषी कायदे आणले.या देशातील संपत्ती केवळ पाच-दहा लोकांच्या हातात राहावी व इतर केवळ जिवंत
राहावेत,असे हे षडयंत्र आहे.या देशातील शेती आणि येणारी पिढी वाचवण्यासाठी आंदोलना शिवाय पर्याय नाही.आमचे आंदोलन हे समतेचे आंदोलन आहे,त्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.blank

केंद्रातील भाजपच्या सरकारसह ‘आरएसएस’ला मानव, शेती, व्यापाऱ्यांशी देणेघेणे नाही. त्यांचा देशातील ४० टक्के जागांवर डोळा आहे. जागा कार्पोरेटच्या हाती देऊन तेथे उद्योग वा शेती करून येथील लोकांना कामगार बनवायची होती. भारतात मजुरी कमी असणेही त्याला कारण आहे. सध्या संपूर्ण मीडियावर सरकार व ‘आरएसएस’चे नियंत्रण आहे.

दिल्लीत आंदोलनातही ते दिसले. त्यामुळे विरोधकांना प्रश्नही ठरवून विचारले जातात. देश, शेतकरी, कष्टकऱ्यांना वाचवण्यासाठी सगळ्यांना तीव्र आंदोलनासाठी तयार रहावे लागणार असल्याचेही टिकैत म्हणाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील वीज यंत्रणेच्या खासगीकरणाच्या विरोधातील वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासह स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनालाही समर्थन घोषीत केले.

 

…तर ‘त्यांनी’ ऑनलाईन शिक्षणावरही प्रतिबंध लावला असता

दिल्लीतील आंदोलनादरम्यान करोनामुळे सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोबाईल तंत्रज्ञान जास्त कळत नसले तरी त्यांची मुले शिकताना अधूनमधून आंदोलनाच्या घडामोडी सांगायचे. त्यामुळे आंदोलनात ऑनलाईन शिक्षणाचा फायदा होत असल्याचे भाजप-‘आरएसएस’ला तेव्हा कळले असते तर त्यांनी या शिक्षणावरही प्रतिबंध घातले असते. महाराष्ट्रात आंदोलनाच्या मजबुतीसाठी कुणीही कार्यक्रम घेतल्यास मी किंवा आमचे नेते येतील. येथील शेतकऱ्यांनी सर्वत्र संयुक्त मोर्चा समिती बनवावे असे आवाहन केले.सोबतच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातेवाईक या राज्यात राहत असल्याने त्यांना सर्व कार्यक्रमात सामावून घेण्यात यावे आणि त्यांनी देशपातळीवर पुढे यायला हवे असे म्हणाले.

blank